काँग्रेस सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना | पुढारी

काँग्रेस सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना

राजेंद्र उट्टलवार

नागपूर : देशात ओबीसींची लोकसंख्या 50 टक्के असताना महत्त्वाची किती पदे ओबीसींच्या वाट्याला येतात, हे कसले ओबीसींचे सरकार, असा सवाल करतानाच देशात काँग्रेसचे सरकार आल्यास जातनिहाय जनगणना केली जाईल, अशी सुस्पष्ट ग्वाही काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी गुरुवारी येथील जंगी सभेत दिली.

येथील बहादुरा स्थित भारत जोडो मैदानातून काँग्रेसच्या 138 व्या स्थापना दिन कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी आहे. महाराष्ट्रासह देशाची सत्ता काँग्रेस मिळविणारच, असा दावा करून राहुल गांधी म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने देशातील विविध स्वायत्त संस्थांवर ताबा मिळविला आहे. कोट्यवधी लोकांना गरिबीत ढकलले आहे. भारतातील तरुण वर्ग केवळ मोबाईलमध्ये गुंतला आहे.

तो सोशल मीडियावर जगू शकत नाही. त्यांना रोजगार हवा आहे. तरुण वर्गाला रोजगार देण्याचे काम केवळ इंडिया आघाडीच करू शकते.

सभेपूर्वी झालेल्या महारॅलीला विदर्भ, राज्याच्या इतर भागाशिवाय शेजारच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल, अजय माकन, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तेलंगणा मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, खा. इम्रान प्रतापगढी, कन्हैयाकुमार यांच्यासह अ.भा. काँग्रेसचे देशभरातून आलेले पदाधिकारी, वरिष्ठ नेते सहभागी झाले होते.

राहुल गांधी म्हणाले, मी माहिती घेतली तेव्हा 90 सनदी अधिकार्‍यांमध्ये केवळ तीन ओबीसी असल्याचे समजले. आज देशात आयएएसमध्ये किती ओबीसी, दलित, आदिवासींना स्थान आहे? कंपन्यांमध्ये किती कर्मचारी या वर्गातून आहेत? या वर्गांना लोकसंख्येच्या प्रमाणात कुठेही भागीदारी मिळत नाही. भाजपच्या लोकांकडून या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी केली. पण भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप त्यांनी केला.

अनेक वर्षे संघ, भाजपचे लोक तिरंग्याला अभिवादन करत नव्हते. याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याची लढाई राजा-महाराजांनी नव्हे, तर सामान्य जनतेने लढली आहे. अनेक राजे-महाराजांची इंग्रजांसोबत भागीदारी होती. काँग्रेस देशाच्या स्वातंत्र्यासाठी, गोरगरिबांसाठी लढली. स्वातंत्र्याची लढाई देशातील जनतेने लढली होती. आज पुन्हा एकदा मूठभर लोकांच्या हिताचे धोरण राबवत गुलामीच्या दिशेने देशाला नेण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

भाजपचा विद्यापीठांवरही कब्जा

केंद्रातील भाजपने सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगासह देशभरातील विद्यापीठांवरही कब्जा केला असल्याची टीका राहुल यांनी यावेळी केली. देशातील विद्यापीठांमध्ये एकाच संघटनेचे कुलगुरू आहेत. त्यांना काहीही येत नाही. त्यांची नियुक्ती गुणवत्तेवर नव्हे तर ते एका संघटनेचे असल्यावरून होत असल्याचा त्यांनी आरोप केला.

प्रसारमाध्यमांवरही ईडीचा दबाव

प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा रक्षक म्हटले जाते. मात्र, आज माध्यमे देशातील लोकशाहीचे रक्षण करीत आहेत का, असा माझा प्रश्न आहे. पत्रकार स्वतःच्या भावना मांडू शकत नाहीत. प्रसार माध्यमेही दबावात आहेत. सीबीआय, ईडीचा त्यांच्यावर दबाव आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची प्रशंसा

महाराष्ट्राची भूमी ही काँग्रेस विचारधारेची आहे. येथील कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण नक्कीच महाराष्ट्र व देशाची निवडणूक जिंकू, असा विश्वासही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.

संघाचा अजेंडा केवळ काँग्रेसच रोखू शकतो : खर्गे

पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा दूर लोटायचा असेल तर जनतेने आताच सतर्क होणे गरजेचे आहे. मोदी-शहा आणि संघाच्या अजेंड्याला रोखण्याची हिंमत केवळ काँग्रेस पक्षात आहे.

भाजप आणि संघाला देशातून आरक्षण, दलित, ओबीसी हद्दपार करायचे आहेत. त्यांचे तसे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप करून ते म्हणाले, भाजपचे मनसुबे यशस्वी होऊ द्यायचे नसतील तर आगामी निवडणुकीत राहुल गांधी आणि ‘इंडिया’ आघाडीला भरभरून पाठिंबा द्या. भाजपवाले नेहमीच देशाच्या सुरक्षेचा आणि लोकशाहीचा मुद्दा पुढे करतात. मात्र, त्यांना संसदेचे संरक्षण करता आले नाही. वाढत्या बेरोजगारीमुळे देशातील दोन तरुण संसदेत घुसले आणि त्यांनी धूर पसरविला. याबद्दल एकाने प्रश्न विचारला म्हणून निलंबित केले. त्यांच्या समर्थनार्थ बाकीचे 140 खासदार पुढे आले असता त्यांनाही निलंबित करण्यात आले. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री लोकशाहीनुसार संसदेत उत्तर न देता इकडे तिकडे जाऊन बोलतात. ही कसली लोकशाही, असा सवालही त्यांनी केला.

Back to top button