Uddhav Thackeray : शिंदे सरकारला दाऊदची ‘मिर्ची’ महत्वाची वाटतेय : उद्धव ठाकरे | पुढारी

Uddhav Thackeray : शिंदे सरकारला दाऊदची 'मिर्ची' महत्वाची वाटतेय : उद्धव ठाकरे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : माझा शेतकरी जो मिर्ची पिकवतो, ती यांना महत्वाची वाटत नाही, त्यांना दाऊदची मिर्ची महत्वाची वाटत आहे, आम्ही जे पुरावे तुमच्यासमोर मांडतो आहोत, त्याची चौकशी करून कारवाई करावी, असे थेट आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि.१८) शिंदे सरकारला दिले. ठाकरे यांनी विधान भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. Uddhav Thackeray

यावेळी म्हणाले की, इक्ब्लाल मिर्चीच काय, प्रफुल्ल पटेल यांचे काय झाले, हे सरकारने सांगावे. सुरुवातीपासून नागपूरमधील हिवाळी अधिवेशन भरकटले आहे. अधिवेशनात शेतकरी, गारपिटीचा विषय महत्त्वाचा होता. पण शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात नाही, अंमलबजावणीचा पत्ता नाही. संकटकाळात जर बळीराजाच्या मदतीला कोण धावून येत नसेल, तर मग त्यांचीसुद्धा चौकशी लावा, सरकारचा आदेश धाब्यावर बसवणाऱ्यांवर कारवाई होत नाही, पीकविमा कंपन्यांवर एसआयटी का लावली नाही? त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे आताच घटनाबाह्य सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली. Uddhav Thackeray

कोणत्याही समाजाचे तसूभरही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण कसे देणार आहात, हे तुम्ही आम्हाला सांगायला हवं, चर्चा कसली करताहेत?आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. आता चर्चा कसली करताय. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या. आमचा पाठिंबा आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणाची शपथ घेतली त्यांनी चर्चा करण्यापेक्षा इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता मागणी केली.

मुंबईतील हिऱ्याचा व्यापार सूरतला नेला आहे. मुंबईतील उद्योग गुजरातमध्ये नेत आहात. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे? असा खोचक सवाल ठाकरे यांनी केला. धारावी पुर्नविकासाला विरोध करण्यासाठी मोर्च्याला आम्ही माणसं चंद्रावरून आणली होती, पण मुद्दा मुंबईचा होता. माणसांवर बोलण्यापेक्षा मुद्द्यावर बोला, असे आव्हान ठाकरे यांनी केले.

भाजपकडून दिशा सालियान प्रकरण

भाजपकडून दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज भाजपला लक्ष्य केले. ठाकरे म्हणाले की, अधिवेशनाची सुरुवात झाली तेव्हाच हे अधिवेशन वेगळ्या दिशेने जाते आहे, असा संशय आला होता. ज्याचा दुरान्वयेही एखाद्या घटनेशी संबंध नाही, अशा प्रकरणातही एसआयटी चौकशी लावली जाते. मात्र, विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे व दिलेल्या पुराव्यांविरोधात एसआयटी लावली जात नाही. या अधिवेशनात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे मुद्दे आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पिक विमा दिला जात नाही. त्यांच्याबद्दल सरकार एसआयटी चौकशी का करत नाही, असा सवाल ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केला. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदित्य ठाकरे, नितीन देशमुख आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button