Dawood Ibrahim : दाऊदच्या साथीदाराबरोबर ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍याची डान्स पार्टी

Dawood Ibrahim : दाऊदच्या साथीदाराबरोबर ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍याची डान्स पार्टी
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार असलेल्या सलीम कुत्तासोबत डान्स पार्टी करणे शिवसेनेचे (ठाकरे गट) नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना चांगलेच महागात पडले आहे. या डान्स पार्टीची महायुती सरकारने गंभीर दखल घेतली असून याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. शिवाय बीड जाळपोळ आणि 16 हजार कोटींच्या पेमेंट गेटवे प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची घोषणाही त्यांनी केली. (Dawood Ibrahim)

सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाच्या या पदाधिकार्‍याचे नाचणे ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे या पदाधिकार्‍याचे सलीमशी काय संंबंध होते याची चौकशी केली जाईल, असे सांगतानाच बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी केली जात असेल तर त्या पक्षाच्या संवेदना मेल्या आहेत, अशी जळजळीत टीकाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटावर नाव न घेता केली. (Dawood Ibrahim)

विधानसभेत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी माहितीचा मुद्दा उपस्थित करत बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदचा साथीदार सलीम कुत्तासोबत नाशिकचा ठाकरे गटाचा पदाधिकारी सुधाकर बडगुजर डान्स पार्टी करत असल्याचा मुद्दा मांडला. राणे यांनी यावेळी पार्टीचे छायाचित्र सभागृहात झळकावले. राणे यांनी हा मुद्दा उपस्थित करताना ठाकरे गटावर टीका करण्याची संधी सोडली नाही. ज्यांनी शिवसेना भवन उडविण्याचा कट आखला होता आणि जे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवावर उठले होते, अशा दाऊदच्या साथीदाराबरोबर शिवसेनेचे नेते पार्टी करतात, असे सांगत हेच शिवसेनेचे हिंदुत्व काय, असा सवाल राणे यांनी केला. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरे गटावर यानिमित्ताने निशाणा साधला. राज्यात पेग, पेंग्विन आणि पार्टी याचे प्रस्थ वाढले आहे. ज्यांनी सेना भवन उडविण्याचा प्रयत्न केला त्या सलीम कुत्तासोबत डान्स पार्टी करायची आणि वरून हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या, याची चौकशी झाली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली.

सत्ताधारी पक्षाच्या वतीने कारवाईची मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. बॉम्बस्फोटातील आणि देशाचा मुख्य शत्रू असलेल्या दाऊदचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत कुणीतरी जाऊन पार्टी करतो, नाचतो ही गोष्ट गंभीर आहे. यात नेमके कुणाचे काय संबंध आहेत, पार्टी करणार्‍यांवर कोणाचा वरदहस्त, आशीर्वाद आहेत याची चौकशी केली जाईल, असेही फडणवीस यांनी म्हणाले.

बडगुजर यांची दोन तास कसून चौकशी

नाशिक : सुधाकर बडगुजर यांची शुक्रवारी पोलिस आयुक्तांकडून 2 तास चौकशी करण्यात आली. अमली पदार्थविरोधी कार्यालयात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी ही चौकशी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तत्पूर्वी बडगुजर यांचे समर्थक पवन मटाले व अन्य दोघांची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या सर्वांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news