ग्रामविकास भरती : वय ओलांडलेल्या विद्यार्थ्यांचे पैसे परत करावे-अंबादास दानवे | पुढारी

ग्रामविकास भरती : वय ओलांडलेल्या विद्यार्थ्यांचे पैसे परत करावे-अंबादास दानवे

नागपूर : पुढारी वृत्तसेवा – ४ वर्षांपूर्वी ग्रामविकास विभागातील भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी पैसे भरले आणि ज्या विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडली त्या विद्यार्थ्यांचे पैसे परत करावेत, अशी मागणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली.

२०१९ मध्ये १३ हजार ५२१ पदांसाठी ३४ जिल्हा परिषदांमध्ये जिल्ह्यात भरती प्रक्रिया घेण्यात आली. मात्र विविध कारणांनी भरती प्रक्रिया रेंगाळली. या भरतीसाठी परीक्षा शुल्कापोटी घेण्यात आलेले ३३ कोटी रुपये त्या-त्या विभागाकडे आणि ग्राम विकास विभागाकडे जमा झाले. मात्र ४ वर्षे झाली तरी विद्यार्थ्यांना पैसे परत मिळाले नाही. त्यामुळे जे विद्यार्थी नव्याने परीक्षेसाठी अर्ज करतील, त्यांचे शुल्क न घेण्याची तरतूद करावी. यात अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे, त्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क त्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी आज सभागृहात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारकडे केली.

परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे पैसे परत देण्याबाबत शासन निर्णय झाला असून विविध माध्यमातून त्याची प्रसिद्धी केली जात असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रश्नावर सरकारकडून देण्यात आली.

Back to top button