राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर | पुढारी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या १११व्या दीक्षांत समारंभासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शुक्रवारी १ डिसेंबर व शनिवारी २ डिसेंबर रोजी नागपूर भेटीवर येत आहेत.

संबंधित बातम्या

शुक्रवार (दि. १ डिसेंबर ) रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पुणे येथून सकाळी १२.१० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे हवाई दलाच्या विशेष विमानाने आगमन होणार आहे. विमानतळावर स्वागताचा स्विकार करून दुपारी १२.२० राजभवनकडे त्यांचे प्रयाण होणार आहे. दुपारी ३.१० वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कुकडे लेआउट येथील श्री. जगन्नाथ मंदिराला भेट देवून याठिकाणी दर्शन व आरतीत सहभागी होणार आहेत.

यानंतर दुपारी ४ वाजता मेडिकलच्या परिसरात आयोजित अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमानंतर राजभवनकडे प्रयाण व मुक्काम करतील.

शनिवार ( दि. २ डिसेंबर ) रोजी द्रौपदी मुर्मू या सकाळी १०.१० वाजता राजभवन येथून कविवर्य सुरेश भट सभागृहाकडे रवाना होतील. येथे सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १११ व्या दीक्षांत समारंभात सहभागी होतील. यानंतर सकाळी ११.४५ वाजता विमानतळाकडे प्रयाण करतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळाहून भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने सकाळी ११.४५ वाजता राष्ट्रपतींचे दिल्लीकडे प्रयाण होणार आहे.

Back to top button