Bjp Vs Uddhav Thackeray: आरक्षण न टिकवण्यात ठाकरे सरकार जबाबदार- सुधीर मुनगंटीवार | पुढारी

Bjp Vs Uddhav Thackeray: आरक्षण न टिकवण्यात ठाकरे सरकार जबाबदार- सुधीर मुनगंटीवार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: उद्धव ठाकरे सरकारने मराठा आरक्षण प्रकरणात कोर्टात केस टिकवली असती, तर ही परिस्थितीच आली नसती. आरक्षण न टिकवण्याला ठाकरे सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे खरंतर त्यांनी मराठा समाजाची माफी मागायला पाहिजे. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी ज्या प्रकारचे राजकारण केले ते अतिशय खालच्या पातळीचे होते. निवडून भारतीय जनता पार्टीसोबत आले आणि जनतेच्या भावनांचा अनादर करत महाविकास आघाडीत गेले. या सगळ्या गोष्टीला उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत. असा आरोप राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. (Bjp Vs Uddhav Thackeray)

मला व्यक्तिगत असे वाटतं की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाबद्दल वक्तव्य करावं असं आवश्यक नाही. पंतप्रधान हे संविधानिक विषयावर भाषणामध्ये मुद्दे मांडतील अशी पद्धत नाही आणि हा शिष्टाचारही नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या विषयावर त्यांचा काय भाव होता? मूक मोर्चा संदर्भात त्यांनी कोणते शब्द वापरले? शालिनीताई पाटील यांना एवढ्या मुद्द्यावरून त्रास देत कसे काढण्यात आलं? असे प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील माजी मविआ सरकारच्या नेत्यांनी केले आहेत. (Bjp Vs Uddhav Thackeray)

राज्याच्या परिस्थितीला बाधा येईल असं भाष्य कुणीही करू नये. आज आम्ही आहोत, उद्या तुम्ही आम्ही कायम राहणार नाही. मात्र, राज्य कायम राहणार आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर मी काही प्रतिक्रिया देणं योग्य नाही, यावरची जास्तीची माहिती त्यांच्याकडून घेऊ शकता. यावर भाष्य करणे मला योग्य वाटत नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान,कोणत्याही ठिकाणी मारपीट करणे, दगडफेक करणे, अशी कोणतीही कृती करणाऱ्यांनी, ही कृती तुमच्यासोबत झाल्यावर कायदा आणि पोलीस स्टेशन आठवतं. पण अशी कृती करण्याआधी एक मिनिट विचार करायला पाहिजे. तुमच्या संदर्भात अशी कृती झाली तर तुम्हाला योग्य वाटेल का? असेही ते म्हणाले. (Bjp Vs Uddhav Thackeray)

आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांचे वक्तव्य केलं. प्रत्येकाला त्याचा अधिकार आहे. कोणी प्रभू रामाला मानतो कोणी रावणाला मानतो. हे हजार वर्षापासून सुरू आहे. आपलं मत कोणी मांडलं त्याच्यावर तुटून पडण्याचं काही कारण नाही. महात्मा गांधी राष्ट्रपिता त्यांच्याही समाधीवर ‘हे राम’ लिहिलं आहे ‘हे रावण’ लिहिलं नाही. महात्मा गांधींना त्यावेळी ते समजलं नसेल का, मिटकरीना काय म्हणायचं आहे नाहीतर ते ‘हे राम’ म्हणण्याऐवजी ‘हे रावण’ म्हणून गेले असते.

विरोधक लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचे काम करीत आहेत. आम्ही मात्र विकास कामांमध्ये दंग राहतो. राज्याची प्रगती झाली पाहिजे यासाठी काम करतो. जनतेच्या फायद्याचा विचार आम्ही करतो. हे पूर्ण रिकामे आहेत आणि म्हणून हे रोज नकारात्मक बोलतात. एवढा त्यांचा राजकारणाचा धंदा राहिला आहे. हे कधीच सांगत नाही की आम्ही काय केले असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

Back to top button