दीक्षाभूमी होणार जागतिक दर्जाचे श्रद्धास्थान; २०० कोटींच्या विकासकामाचे ई-भूमिपूजन | पुढारी

दीक्षाभूमी होणार जागतिक दर्जाचे श्रद्धास्थान; २०० कोटींच्या विकासकामाचे ई-भूमिपूजन

नागपूर : पुढारी वृत्तसेवा :  नागपूरच्या दीक्षाभूमीवर ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी 200 कोटींच्या विकासकामांचे ई भूमिपूजन पार पडले. दीक्षाभूमी जागतिक दर्जाचे श्रद्धास्थान करण्याचा संकल्प यावेळी हजारोंच्या जनसागरापुढे करण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या अलोट जनसागराच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन संदेश देत तर केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शुभ कार्याची आज मुहूर्तमेढ रोवली.

या विकास कामासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला अधिकृत एजन्सी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. दीक्षाभूमीच्या 22.80 एकर परिसराचा विकास जागतिक दर्जाचा करण्यात येणार आहे, राज्य शासनातर्फे ७० कोटी रुपयांच्या धनदेशाचे वितरणही करण्यात आले.

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, प्रमुख पाहुणे डॉ.आफिनिता चाई चाना, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. कृपाल तुमाने, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सदस्य डॉ.कमलाताई रा.गवई, ऍड. मा.मा. येवले, डॉ. सुधीर फुलझेले, आनंद फुलझेले, एन.आर. सुटे, डॉ.राजेंद्र गवई, डी.जी.दाभाडे, विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम,भन्ते नाग दीपांकर,प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, समाज कल्याण उपायुक्त सुकेशिनी तेलगोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

हेही वाचा

Back to top button