गडचिरोली : रामाळा येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार | पुढारी

गडचिरोली : रामाळा येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : शेतात धान कापत असताना वाघाने अचानक हल्ला केल्याने एक महिला ठार झाली. ही घटना आज (दि. 19) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील रामाळा गावानजीक घडली. ताराबाई एकनाथ धोडरे (वय 60, रा. काळागोटा, आरमोरी) असे मृत महिलेचे नाव आहे.

ताराबाई धोडरे या गुरुवारी अन्य सहा मजूर महिलांसह रामाळा येथील अमोल धोडरे यांच्या शेतावर धान कापणीसाठी गेल्या होत्या. बांधाजवळ धान कापत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात ताराबाई जागीच ठार झाल्या. यावेळी सोबत असलेल्या महिलांनी घटनास्थळावरून पळ काढला.

माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी अविनाश मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. मृत महिलेच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

Back to top button