गडचिरोली: रानटी हत्तीच्या हल्ल्यात शेतकरी ठार

file photo
file photo

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा: शेतात आलेल्या रानटी हत्तीना परतावून लावत असताना एका हत्तीने हल्ला करून शेतकऱ्यास ठार केले. ही घटना मंगळवारी १७ ऑक्टोबरला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास गडचिरोलीपासून १० किलोमीटर अंतरावरील दिभना या गावात घडली. होमाजी गुरनुले (५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मागील काही दिवसांपासून देसाईगंज आणि आरमोरी तालुक्यात रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी हत्तींचा कळप गडचिरोली तालुक्यातील गोगाव, अडपल्ली, दिभना या गावांमध्ये आला. या हत्तींनी धानपिकाचे प्रचंड नुकसान केले. मंगळवारी रात्री हे हत्ती शेतात आल्याचे कळताच होमाजी गुरनुले हे काही शेतकऱ्यांसह शेतावर गेले. हत्तींना परतावून लावत असताना एका हत्तीने होमाजी गुरनुले यांच्यावर हल्ला केला आणि सोंडेने आपटून ठार केले. वडसा वनविभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

१६ सप्टेंबरला आरमोरी तालुक्यातील पळसगाव-डोंगरगाव रस्त्यावर एका हत्तीने सुधाकर आत्राम नामक वनविभागाच्या वाहनचालकास ठार केले होते. त्यानंतर महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी प्रचंड भयभीत झाले असून, त्यांना शेतीची कामे करणे दुरापास्त झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news