Bhandara News: भंडारा: जिल्ह्यात साडेचार कोटींचा धान घोटाळा; ११ जणांविरुद्ध गुन्हा | पुढारी

Bhandara News: भंडारा: जिल्ह्यात साडेचार कोटींचा धान घोटाळा; ११ जणांविरुद्ध गुन्हा

भंडारा; पुढारी वृत्तसेवा: सन २०२२ ते २०२३ या हंगामातील शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत साडेचार कोटींचा धान घोटाळा उघडकीस आला आहे. लाखांदूर तालुक्यातील राष्ट्रसंत सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था गवराळा या संस्थेने कोट्यवधीचा धान्य घोटाळा झाल्याची घटना समोर आली आहे. संस्थेअंतर्गत  १४,८०२ क्विंटल धानाची अफरातफर केली असून, ४ कोटी ५२ लाख ९७ हजार ४८६ रुपयाचा आर्थिक घोटाळा झाला आहे. दरम्यान संस्थेचे अध्यक्ष सचिन मेंढे यांचेसह संस्थेच्या अकरा संचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या लेखी तक्रारीवरून कारवाई करत लाखांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सन २०२२ ते २०२३ या हंगामात शासकीय आधारभूत धान्य खरेदी अंतर्गत लाखांदूर तालुक्यातील राष्ट्रसंत सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था गवराळा या उपअभिकर्ता संस्थेला धान्य खरेदी करीत जिल्हा पणन विभागातर्फे नियुक्त करण्यात आले होते. सदर संस्थेने सबंधित कालावधीत ४६३ शेतकऱ्यांकडून १९४५०.८० क्विंटल धानाची खरेदी केल्याची माहिती दिली. शासनाच्या वतीने संपूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आले. मात्र जिल्हा पणन कार्यालयातर्फे सदर संस्थेकडून धान्याची उचल करण्यासाठी विविध राईस मिलर्सना डिओ दिले असता, केवळ ४६४८.७०  क्विंटल धान्याची उचल झाली. उर्वरित १४८०२.१० क्विंटल धान सदर संस्थेकडे उपलब्धच झाला नाही. म्हणजे प्रत्यक्षरित्या धानाची अफरातफर करण्यात आली असल्याची बाब उघडकीस आली आहे.

यात ४ कोटी ५२ लाख ९७ हजार ४८६ रुपयांचा आर्थिक घोटाळा करण्यात आल्याने राष्ट्रसंत सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था गवराळाचे अध्यक्ष सचिन मेंढे, व्यवस्थापक सचिव चोपराम गोविंदा नाकाडे यांचेसह संस्थेचे अन्य ९ संचालकांच्या विरोधात लाखांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button