Vijay Wadettiwar : मराठवाड्यात २८ लाख ओबीसी प्रमाणपत्रांचे गैरमार्गाने वाटप: विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट | पुढारी

Vijay Wadettiwar : मराठवाड्यात २८ लाख ओबीसी प्रमाणपत्रांचे गैरमार्गाने वाटप: विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुकवारी मुंबई येथे बैठक पार पडली. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी टीकास्त्र सोडले आहे.

ओबीसी बैठक हा एक फार्स असून गेल्या पाच वर्षात मराठा समाजाच्या किमान २८ लाख लोकांना मराठवाड्यात गुपचूप सरसकट ओबीसी प्रमाणपत्रांचे गैरमार्गाने वाटप झाल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. गेल्या दीड-दोन वर्षात यातील निम्मे प्रमाणपत्रांचे गतीने काम झाले, याविषयी एसआयटी चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीदेखील मराठा असताना ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. अंबादास दानवे मराठा असताना ओबीसी प्रमाणपत्र घेतले आहे. अशा प्रकारे सुमारे २८ लाख लोकांना पैसे देऊन ओबीसी प्रमाणपत्राचा लाभ देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. एकीकडे सरकार जनतेला मराठा-ओबीसी असे आपसात झुंजवत ठेवते आणि दुसरीकडे गुपचुपपणे सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटण्याचे काम करत आहे. या प्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे. विशेषतः बोगस ओबीसी प्रमाणपत्र मिळवून नोकऱ्या लाटणाऱ्यांची एसआयटी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.

हेही वाचा 

Back to top button