Nagpur News:उपराजधानीत अतिवृष्टीमुळे दहा हजारावर घरांचे नुकसान; उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून पाहणी | पुढारी

Nagpur News:उपराजधानीत अतिवृष्टीमुळे दहा हजारावर घरांचे नुकसान; उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून पाहणी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: शनिवारी (दि.२३ सप्टेंबर) अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. तसेच येथील नाग नदीला पुर आला. जोरदार पावसामुळे उपराजधानीत सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले. साखरझोपेत असताना घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले. यानंतर नागपूर मनपा प्रशासनाने नागरिकांना तातडीने मदत पोहचवत त्यांना सुरक्षितस्थळी हलवले. पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक घरात चिखल साचला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या भागाची पाहणी केली. त्यानंतर नागरिकांना तातडीने मदत करण्याच्या दृष्टीने नुकसाना संदर्भात पंचनामा करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तसेच तात्काळ मदत देण्याची ग्वाही देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्तांना दिली.

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चार तासात झालेल्या जोरदार पावसामुळे अंबाझरी परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे अन्नधान्यासह इतर साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केली. डागा लेआउट, कार्पोरेशन कॉलनी, शंकरनगरसह इतर वस्त्यांना भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला. घरात चिखलामुळे झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली. आभाळ फाटल्यासारखा झालेला पाऊस आणि सणासुदीच्या दिवसात झालेल्या नुकसान संदर्भात नागरिकांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. दरम्यान जास्तीत जास्त मदत करण्याची ग्वाही यावेळी फडणवीस यांनी दिली.

नाग नदीला आलेल्या पुराची तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटनेची संपूर्ण माहिती यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली. चार तासात 110 मिलिमीटर एवढा पाऊस झाला असून, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नदीचे पात्र कमी पडल्यामुळे इतर वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यापुढे अशी घटना घडणार नाही याची दखल घेण्यात आली असून, पाण्याचा प्रवाह कुठेही थांबणार नाही, या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येईल. भविष्यात अशा घटना टाळण्यास येतील असेही नागरिकांना फडणवीस यांनी यावेळी आश्वस्त केले.

पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे सर्वत्र चिखल साचला आहे. मनपाच्या वतीने घरातील चिखल काढण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्वांना क्लोरीनच्या गोळ्या देण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री फडणीस यांनी दिलेत.

उपमुख्यमंत्र्यांना करावा लागला नागरिकांच्या रोषाचा सामना

या अतिवृष्टीमुळे नागनदी शेजारील पूर्व नागपूरला,अनेक झोपडपट्ट्याना जसा फटका बसला त्यापेक्षा अधिक अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लोमुळे एलएडी, धरमपेठ कॉलेज, पूर्ती बाजार, व्होकार्ट, केअर हास्पिटल, बर्डी, धंतोली, अंबाझरी, हिलटोप अशा पॉश वस्त्यांना, इलेक्ट्रॉनिक मार्केट, व्यावसायिकांना मोठा फटका बसला. हे नुकसान खूप मोठे असल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांना रविवारच्या पाहणी दौऱ्यात काही ठिकाणी संतापलेल्या नागरिकांशीही सामना करावा लागला. आमचेही नुकसान बघा अशी लोक विनवणी करीत होते. माध्यमांसमोरच एका इसमाला स्वतः त्यांना ओढत बाजूला घ्यावे लागल्याने  सुरक्षा यंत्रणेचीही तारांबळ उडाली.

अंबाझरी ओव्हरफ्लो पॉइंटला उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

उपमुख्यमंत्र्यांनी सकाळी अंबाझरी तलाव, नाग नदी तसेच कार्पोरेशन कॉलनी डागा लेआउट शंकर नगर आदी पॉश वस्त्यांना यावेळी अंबाझरी ओव्हरफ्लोचा 15 वर्षांत तडाखा बसला. यावेळी माजी महापौर संदीप जोशी,मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी,जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्यासह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Back to top button