गडचिरोली: नक्षल्यांनी पुरुन ठेवलेली स्फोटके जप्त   | पुढारी

गडचिरोली: नक्षल्यांनी पुरुन ठेवलेली स्फोटके जप्त  

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा: पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने नक्षल्यांनी कोरची तालुक्यातील बेळगाव घाट जंगल परिसरात जमिनीत पुरून ठेवली होती. ही स्फोटके शोधून काढण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली नक्षलविरोधी अभियान पथकाने स्फोटके जप्त करण्याची कारवाई केली आहे.
गुरूवारपासून (दि. २१ सप्टेंबर) नक्षलवाद्यांच्या वर्धापन सप्ताहाला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नक्षलवादी सक्रिय झाले आहेत. कुरखेडा उपविभागांतर्गत बेळगाव पोलीस मदत केंद्र हद्दीत पुराडा पोलीस ठाण्यातील जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते. कोरची व टिपागड दलमच्या नक्षलवाद्यांनी मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहित्य पुरुन ठेवले असल्याची माहिती मिळताच जंगलात शोधमोहीम राबवली.
यावेळी जमिनीत अंदाजे दीड ते दोन फूट खोल स्फोटक पदार्थ भरुन असलेले ४ पाकीट आढळून आले. त्यात ११.८ किलो स्फोटके होती. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही स्फोटके नष्ट केली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल , अपर अधीक्षक (अभियान) अनुज तारे , कुमार चिंता, यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुराडा ठाण्याचे सहायक निरीक्षक भूषण पवार व जवानांनी ही कारवाई केली. बेळगाव ठाण्यात गुन्हा नोंद केला असून उपनिरीक्षक लक्ष्मण अक्कमवाड तपास करीत आहेत.

Back to top button