अमरावती, पुढारी वृत्तसेवा : शासनाने अनेक पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तरूणांमध्ये रोष निर्माण झाला आहे. कंत्राटी भरतीमुळे तरूणांचे भवितव्य अंधारात आहे, असा आरोप आमदार देवेंद्र भुयार यांनी केला आहे. या बाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील तरुण पिढीला शासकीय सेवेत रुजू होताना जर कंत्राटी पद्धतीने सेवेत रुजू व्हावं लागतं असेल तर हे निंदनीय आहे. तरुण पिढी कित्येक वर्षांपासून शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहेत. असे असताना सरकार जर तरुणांच्या अपेक्षा भंग करीत असेल तर ते खेदजनक आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तरुणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तरुणांना सरकारी नोकरी पासून मुकावे लागत आहे. सरकारच्या या कृतीचा आमदार देवेंद्र भुयार यांनी जाहीर निषेध केला आहे.