ताडोबा ऑनलाईन बुकींग प्रकरण – जिल्हा सत्र न्यायालयाने ठाकूर बंधूचा जामीन अर्ज फेटाळला | पुढारी

ताडोबा ऑनलाईन बुकींग प्रकरण - जिल्हा सत्र न्यायालयाने ठाकूर बंधूचा जामीन अर्ज फेटाळला

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन सफारी ऑनलाईन बुकींग प्रकरणात सुमारे बारा कोटी अफरातफर केल्याप्रकरणी आरोपी चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हीटी सोल्युशन या कंपनीच्या ठाकूर बंधूना जिल्हा व सत्र न्यायालयाने दणका देत जामिन अर्ज फेटाळून लावला आहे. ताडोबा फाऊंडेशनची १२ कोटी १५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्यानंतर आरोपी अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहीत विनोदकुमार ठाकूर या दोघांवर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून ठाकूर बंधू फरार आहेत. न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

10 डिसेंबर 2021 ते 17 ऑगस्ट 2023 कालावधीतील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीचे ऑनलाईन बुकींगचे कंत्राट अभिषेक विनोदकुमार ठाकुर, रोहीत विनोदकुमार ठाकुर रा. चंद्रपूर यांच्या चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन कंपनीला देण्यात आले होते. कंपनी व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूरचे कार्यकारी संचालक यांच्यामध्ये सर्विस लेवल अर्गिमेंटद्वारे अटी व शर्तींवर हा कायदेशीर करार करण्यात आला होता. करारानंतर ठाकूर बंधू यांची कंपनी ऑनलाईन बुकींग करून त्यापासून मिळणार सर्व महसूल हा कंपनीकडे जमा करीत होते.

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प संवर्धन प्रतिष्ठा चंद्रपूर (टी.ए.टी.आर.) ने सन 2020-21, 2021-22, 2022-23 व सन 2023-24 या वर्षाचे ऑडीट केले असता त्यामध्ये चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हीटी सोल्युशन कंपनीने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर यांना 10 कोटी 65 लाख 16 हजार 918 रूपये भरणा केला. उर्वरीत रक्कम 12 कोटी 15 लाख 50 हजार 831 रुपये भरणा केली नाही. ठाकूर बंधूच्या कंपनीने करारनाम्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन करून सुमारे बारा कोटीची अफरातफर केल्याचे उघड झाल्यानंतर चंद्रपूर रामनगर पोलिस ठाण्यात विभागीय वनाधिकारी सचीन उत्तम शिंदे यांनी तक्रार दाखल केली होती.

तेव्हापासून चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन कंपनीचे आरोपी अभिषेक विनोदकुमार ठाकुर व रोहीत विनोदकुमार ठाकुर पसार झाले आहेत. त्यांनी अटकपूर्व जामिन अर्जाकरीता जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज सादर केला होता. परंतु न्यायालयाने ठाकूर बंधूना दणका देत जामिन अर्ज फेटाळून लावला. पोलिसांनी दोन्ही आरोपींची शोध मोहीम सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. तपास उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांच्या नेतृत्वात सुरू आहे. दरम्यान जिल्हा न्यायालयाने अभिषेक व रोहित ठाकूर या दोन्ही भावंडांचा जामिनासाठीचा अर्ज फेटाळल्याने त्यांना आर्थिक गुन्हे शाखेकडे शरणागती पत्करावी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Back to top button