चंद्रपूर: विजेच्या धक्क्याने ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू; एक गंभीर 

चंद्रपूर: विजेच्या धक्क्याने ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू; एक गंभीर 
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा :  शंकरपूर येथे ग्राम पंचायत सदस्याचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना शनिवारी (दि. ५) दुपारी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे घडली. संजय मनिराम नन्नावरे (वय ४०) असे मृताचे नाव आहे.
चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे नागरीकांना शुध्द व थंड पाणी पूरवठा करण्याकरिता आरो फिल्टर प्लांट बसविण्यात आला आहे. हा प्लांट ग्रामपंचायत सदस्य संजय नन्नावरे दोन वर्षांपासून चालवित आहेत. आज शनिवारी आरो प्लांट मधून नागरीकांना पाणी पुरवठा केल्यानंतर येथे काम करणारा अमन सुधाकर बारेकर (वय 16) याने  प्लांट बंद करण्यासाठी चॅनल गेटला हात लावला. सोबत ग्राम पंचायत सदस्य संजय मनिराम नन्नावरे हा देखील होता. दोघांनी एकाचवेळी विद्युत शॉक लागला. विद्युत झटक्याने दोघेही खाली कोसळले. जवळच्या लोकांनी लगेच धावून येत विद्युत प्रवाह बंद ननकेला. लगेच दोघांनाही शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. ग्राम पंचायत सदस्य संजय नन्नावरे गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले, परंतु तिथेच त्यांचा   मृत्यू झाला. अमन बारेकर हा गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. संजय नन्नावरे हे वार्ड नंबर 3 चे  मागील दहा वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य होते. उच्च विद्याविभुषित अतिशय होतकरू व जनसामान्यांच्या सेवेला धावणारा युवक म्हणून त्याची  ओळख होती. त्यांच्या मागे आई पत्नी व दोन मुलं असा परिवार आहे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून ग्रामीण रुग्णालय चिमूर येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news