कोल्हापूर : गळके छप्पर, फुटलेल्या खिडक्या अन् कालबाह्य दरवाजे; वडगावच्या पोस्ट ऑफिसची दुरावस्था | पुढारी

कोल्हापूर : गळके छप्पर, फुटलेल्या खिडक्या अन् कालबाह्य दरवाजे; वडगावच्या पोस्ट ऑफिसची दुरावस्था

किणी; राजकुमार चौगुले : गळके छप्पर, फुटलेल्या खिडक्या, कालबाह्य झालेले दरवाजे ही दुरावस्था आहे. दररोज सात आठ लाखांची उलाढाल असणाऱ्या पेठ वडगावच्या पोस्ट ऑफिसकडे गेली कित्येक वर्षे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे या ठिकाणी सुसज्ज पोस्टऑफिस करण्याची मागणी होत आहे.

पेठ वडगांव हे आजूबाजूच्या बावीस खेड्यांच्या दररोजच्या व्यवहाराचे प्रमुख केंद्र आहे. या ठिकाणी बँका, पतसंस्था, शाळा, महाविद्यालये, कोर्ट यामुळे वडगांव पोस्ट ऑफिसमध्ये उलाढाल मोठी असते. या पोस्ट ऑफिसला सभोवतालच्या ११ खेड्यांची ब्रँच ऑफिस जोडली गेली आहेत. त्यामुळे किणी, घुणकी, चावरे, वाठार, अंबप, मनपाडळे, तळसंदे, भादोले, लाटवडे, भेंडवडे, बुवाचे वाठार या सर्व गावच्या टपाल, स्पीड पोस्ट, पार्सल, अल्पबचत, जीवन विमा या सर्व प्रकारच्या सेवा वडगांव पोस्ट ऑफिसच्याच अखत्यारीत येतात. याशिवाय आधार कार्ड लिंकिंगसारख्या सुविधांसाठी व इतर सेवांसाठी टोप, संभापूर, मिणचे, सावर्डे, खोची, नरंदे या आसपासच्या गावचे नागरिकही गर्दी करतात. या ठिकाणी दररोज सात ते आठ लाख रुपयांची उलाढाल होते.

पूर्वी हे पोस्ट ऑफिस सध्याच्या वडगांव नगरपालिकेच्या महालक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या जुन्या जागेत होते. या ठिकाणी जागा अपुरी व गैरसोय होत असल्याने, सुमारे ३०-३२ वर्षांपूर्वी याचे स्थलांतर नगरपालिकेच्या भाजी मार्केटमधील भाड्याच्या इमारतीत करण्यात आले. तेव्हापासून याच ठिकाणी पोस्टाचा कारभार सुरू आहे, मात्र गेल्या आठ नऊ वर्षांपासून या इमारतीला घरघर लागली आहे. अगदी कामकाजाच्या ठिकाणी जिथे काउंटर, संगणक आहेत त्या ठिकाणी स्लॅबला गळती लागली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून काऊंटरवर प्लास्टिकची ताडपत्री बांधली आहे. काही ठिकाणी स्लॅबचे ढपले पडले आहेत, खिडकीच्या काचा फुटल्या आहेत, दरवाजे व्यवस्थित लागत नाहीत, स्वच्छतागृहाची अवस्था तर खूपच वाईट, तिथलाही स्लॅब गळत आहे, अशा स्वच्छतागृहामुळे महिला कर्मचाऱ्यांचीही अडचण होत आहे. या सर्व गैरसोयींबाबत अनेकदा नगरपालिका प्रशासनास कळवून या कार्यालयाचे नूतनीकरण करण्याची मागणी केली आहे, मात्र त्यांनी या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. तातडीने पोस्ट ऑफिस व नगरपालिका प्रशासन यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

वडगांव शहर हे सभोवतालच्या गावांचे केंद्रस्थान आहे,व्यापारपेठ असल्याने उलाढाल व व्यवहार जास्त आहे, या ठिकाणी सुसज्ज पोस्ट ऑफिस व पुरेसे कर्मचारी असण्याची गरज आहे.
– फिरोज बागवान, राष्ट्रवादी काँग्रेस ,पेठ वडगांव

Back to top button