चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; कोरपना तालुक्यात ढगफुटी, जिल्हाधिकाऱ्यांचा सतर्केता इशारा | पुढारी

चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; कोरपना तालुक्यात ढगफुटी, जिल्हाधिकाऱ्यांचा सतर्केता इशारा

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी (दि. २६) अडीच वाजताच्या सुमारास विजांच्या कडकटात जोरदार पाऊस झाला. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास गोरखनाथ तालुक्यातील माणिकगड रूपा पेठ परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. राजुरा गडचांदुर कोरपना या मुख्य मार्गासह कोरपना तालुक्यातील जांभुळधरा उमरहिरा, रूपापेठ हे मार्ग बंद झाले आहेत. तर खामोना जवळील पुलाला पूर आल्याने ही मार्ग बंद झाला आहे. गुरुवारी (दि. 27) हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याने जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शाळांना सुटी जाहीर केली असून सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात 26 ते 29 जुलै पर्यंत ऑरेंज व यलो अलर्ट दिला आहे. अलर्टच्या पहिल्याच दिवशी आज बुधवारी (दि. २६) जिल्ह्यात दुपारी दोन वाजल्यापासूनच सर्वत्र जोरदार पाऊस झाला. अडीच ते चार दरम्यान झालेल्या विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसात सहा मृत्यूमुखी तर नऊ जण जखमी झाले. त्यामध्ये दोन शाळकरी मुलींचा समावेश आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर व माणिकगड रूपापेठ परीसरात ढग फुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे कोरपना परिसरातील काही गावे प्रभावित झाली. राजुरा गडचांदुर कोरपना हा मुख्य मार्ग बंद झाला आहे.

कोरपना तालुक्यातील अंतर्गत मार्गावरील नाल्यावर पूर आल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत. त्यामध्ये जांभूळधारा – उमरहिरा, दुर्गाडी – मांगलहिरा, रूपापेठ- खडकी, ढोपटाळा -शरज, कोडशी -पिपरी, कुसळ -पिपर्डा आदिनमार्ग बंद झाले आहेत. गडचांदूर, माणिकगड, रूपापेठ परीसरात पाऊस झाल्याने या परिसरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. असाच पाऊस सुरूच राहीला तर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याच आठवड्यात कोरपणा तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील अनेक गावांना धोका झाला. अनेक मार्ग बंद झाल्याने नागरिकाना त्रास सहन करावा लागला. शिवाय आज बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून काही जणांचा मृत्यू झाल्याने काळा दिवस ठरला.

खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी गौडा यांचे आवाहन

चंद्रपूर जिल्ह्यात जुलै महिन्यात यापुर्वी अनेक तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक रस्ते पाण्याखाली गेले आणि अनेक गांवाना पुराचा वेढा पडल्याने जनजिवन विस्कळित झाले होते. भारतीय हवामान खात्याच्या पुन्हा उद्या गुरुवारी  चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीची वर्तविली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यावर होऊ नये या करिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालये यांना उद्या 27 जुलै ल जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सुट्टी घोषित केली. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालये बंद राहतील. मात्र, इयत्ता ‘दहावी व बारावी पुरवणी परिक्षा वेळापत्रकानुसार सुरु राहतील तसेच सर्व निवासी शाळा नियमितपणे सुरु राहणार आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता नागरीकांनी  सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी गौडा यांनी केले आहे.

Back to top button