गडचिरोलीत मुसळधार पाऊस, पुरामुळे १५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला | पुढारी

गडचिरोलीत मुसळधार पाऊस, पुरामुळे १५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : काल मध्यरात्रीपासून जिल्हृयाच्या सर्व भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक नदी, नाल्यांना पूर आला आहे. दुपारपर्यंत १६ प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद असल्याने जवळपास दीडशेहून अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.

भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी तीन ते चार फूट पाणी वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग बंद आहे. गोमणीनजीकच्या दिना नदीच्या पुलावरुन आणि कोपरअली येथील नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आलापल्ली-मुलचेरा-आष्टी मार्ग खंडित झाला आहे. एटापल्ली तालुक्यातील कसनसूर-एटापल्ली-आलापल्ली, आष्टी-गोंडपिपरी या प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. शिवाय चातगाव-कारवाफा-पोटेगाव, पोटेगाव-राजोली-कुनघाडा, तळोधी-आमगाव, अहेरी-व्यंकटापूर इत्यादी मार्ग बंद झाले आहेत. एकूणच पावसामुळे जवळपास दीडशे गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.

मागील चोवीस तासांत मुलचेरा तालुक्यात सर्वाधिक ११७.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल एटापल्ली तालुक्यात ९५.१ मिलीमीटर पाऊस पडला. पावसामुळे कुठेही जीवीतहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी २१ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून २ हजार ४२८ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button