Nagpur Crime News : कांबळे दुहेरी हत्याकांड, तिघांना जन्मठेप; अल्पवयीन आरोपीस ३ वर्षाची शिक्षा | पुढारी

Nagpur Crime News : कांबळे दुहेरी हत्याकांड, तिघांना जन्मठेप; अल्पवयीन आरोपीस ३ वर्षाची शिक्षा

पुढारी वृत्तसेवा, नागपूर, दि. 14 : Nagpur Crime News : विशेष सत्र न्यायालयाचे न्या. एस.बी. गावंडे यांनी शुक्रवारी बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणातील तीन आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गणेश शिवभरण शाहू हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. इतर आरोपींमध्ये गणेशची पत्नी गुडिया ऊर्फ गुड्डी व भाऊ अंकित यांचा समावेश आहे. या तिघांना जन्मठेपेची शिक्षा झाली असून सर्व पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत. एका अल्पवयीन आरोपीला तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. साडेपाच वर्षानंतर या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आज निकाल दिला.

उषा कांबळे व राशी कांबळे, अशी मृतकांची नावे होती. आजी व नातीची निर्घृण हत्या करून मृतदेह नाल्यात फेकले होते. उषा कांबळे या पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आई होत्या. जिल्हा न्यायालयाने घटनेतील ३ मुख्य आरोपींना म्हणजेच गणेश शाहू , अंकित शाहू आणि गुडिया शाहू यांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली , तर या प्रकरणातला चौथा आरोपी घटनेच्या वेळी अल्पवयीन असल्यामुळे त्याला ३ वर्षांची शिक्षा सुनावली. Nagpur Crime News

मयत उषा व राशी कांबळे

ही घटना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली. आरोपी गणेश शाहू व उषा कांबळे यांच्यामध्ये भिशीच्या पैशांवरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीडवर्षीय राशीचाही निर्घृण खून केला आणि त्यांचे मृतदेह उमरेड रोडवरील विहीरगावजवळच्या नाल्यात फेकून दिले. दुसरीकडे कांबळे कुटुंबीयांनी संध्याकाळपासून आजी-नाती बेपत्ता असल्याने शोधा शोध सुरू अखेर त्या न सापडल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांचे मृतदेह नागपूर-उमरेड रस्त्याजवळ नाल्यात एका पोत्यात सापडले.

बेपत्ता होण्यापूर्वी उषा कांबळे या नातीला घेऊन घराजवळ ज्वेलर्सकडे पायपट्टी घेण्यासाठी गेल्या होत्या. परत येताना शिव किराणा स्टोअर्सजवळ त्या काही वेळ थांबल्याचे व त्यानंतर घरी न आल्याचे तक्रारीनंतर हुडकेश्वर पोलिसांच्या तपासात पुढे आले. पोलिसांना कांबळे कुटुंबीयांच्या घरापासून 100 मीटर अंतरावर शिव किराणा स्टोअर्स अँन्ड डेली नीड्ससमोर उभी असलेली महिंद्राची गाडी संशयास्पदरित्या धुतलेली आढळली.

पोलिसांनी चौकशी केली असता कारमध्ये पोलिसांना काही रक्ताचे डागही मिळाले. यावरून पोलिसांनी किराणा दुकान मालक गणेश शाहूला ताब्यात घेतले. गणेशच्या घराच्या वरच्या मजल्यावरही अनेक ठिकाणी रक्ताचे डाग आढळले. इतकंच नाही, तर किचनमधील बेसिन आणि बाथरुमच्या नळाजवळही रक्ताचे डाग आढळले. छतावरच्या पंख्याच्या एका पात्यावरही रक्ताचे डाग आढळले. परिसरातील काही लोकांनी शनिवारी संध्याकाळी उषा कांबळे यांना शिव किराणा स्टोअर्सजवळ बघितल्याने पोलिसांपुढे आर्थिक वादातून आपण या दोघींची हत्या केल्याची कबुली गणेश शाहूने दिली. याकामी पत्नी गुडिया आणि छोट्या भावानेही मदत केल्याचे उघड झाल्यानंतर सर्वांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारच्या वतीने विशेष वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. फिर्यादी रविकांत कांबळे यांचे वकील ॲड. समीर सोनवणे यांनी त्यांना सहकार्य केले.

Nagpur Crime News : फडणवीस यांनी अॅड. निकम यांची नियुक्ती

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र  फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील म्हणून ऍड उजवल निकम यांची नियुक्ती केली होती , अधिवक्ता निकम यांनी कोर्टासमोर मांडलेले ३५ साक्ष आणि पुरावे बघता आज न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवित दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आज या निकालावर अॅड उजवल निकम यांनी समाधान व्यक्त केले.

Nagpur Crime News : उज्वल निकम आणि तपास यंत्रणेमुळे मिळाला न्याय – रविकांत कांबळे

या प्रकरणात न्यायालयाने आरोपींना सुनावलेली शिक्षा योग्य असल्याची भावना व्यक्त करत पत्रकार रविकांत कांबळे यांनी निर्णयावर समाधान व्यक्त केले. या प्रकरणात तपास यंत्रणेने आणि विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी योग्य तपास आणि केलेल्या युक्तिवादामुळेच हा निर्णय येऊ शकल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. आज या प्रकरणी निकाल येणार असल्याने न्यायालय परिसरात मोठी गर्दी होती.

 

हे ही वाचा :

बंगळुरु हादरले! तलवारीने कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांचा खून; माजी कर्मचाऱ्याचे कृत्य

नाशिक : इंदिरानगरमध्ये युवकाचा निर्घृण खून

Back to top button