विरोधी पक्ष नेतेपदावर काँग्रेसचा दावा, शिंदे यांचे हे शेवटचे अधिवेशन : वडेट्टीवार | पुढारी

विरोधी पक्ष नेतेपदावर काँग्रेसचा दावा, शिंदे यांचे हे शेवटचे अधिवेशन : वडेट्टीवार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने आता विरोधी पक्ष नेतेपद कोणाकडे येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांची घोषणा करण्यात आली असली तरी आता काँग्रेसनेही या पदावर दावा केला आहे. विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय कुण्या पक्षाकडून नव्हे तर विधानसभेच्या अध्यक्षांकडून होत असतो, याकडे लक्ष वेधत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे हे शेवटचे अधिवेशन असेल असा दावा केला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ गट नेते बाळासाहेब थोरात यांनीही या पदावर काँग्रेसचा दावा सांगितला आहे.

माध्यमांशी बोलताना माजी मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, विरोधी पक्ष नेतेपद नेमके कोणाकडे असावे, हे सदस्य संख्येवरून ठरविले जाते. ज्या पक्षाच्या आमदारांची संख्या अधिक, त्याच पक्षाचा विरोधी पक्षनेता राहणार आहे. त्यामुळे हा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनाच घ्यावा लागणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांनी दंगली घडवल्या, जातीय तेढ निर्माण करून पाहिली, त्यांना यश आले नाही. अखेर आपला पाय खोलात जात असल्याचे लक्षात आल्यानेच सत्ताधाऱ्यांनी पुन्हा हा नवा प्रयोग केला. राष्ट्रवादीतली कालची फूट ही अनपेक्षित होती, असे म्हणणे चुकीचे आहे. अजित पवार यांना समजाविण्याचे शरद पवारांचे प्रयत्न सुरूच होते. पण त्यांना थांबायचे नव्हते. सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते राहू शकत नाहीत. सत्ता गेली त्या दिवसापासून धुसफुस होती. दादांचा कल सत्तेकडे होता, हे पवार साहेबांसह त्यांच्या इतर नेत्यांच्या लक्षात आले होते. शरद पवारांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रकरण त्यांच्याही आवाक्याबाहेर गेले.

आगामी अधिवेशन हे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे अखेरचे अधिवेशन असेल. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरविल्यावर नेमके काय, याचीच ही तजवीज आपल्या सत्तेसाठी भाजपने करुन ठेवली असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

Back to top button