सरकारला खडेबोल ही फॅशन मी स्विकारणार नाही : डॉ. रवींद्र शोभणे

डॉ. रवींद्र शोभणे www.pudhari.news
डॉ. रवींद्र शोभणे www.pudhari.news

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सरकारला खडेबोल सुनावणे ही फॅशन ठरणार असेल तर ती मी स्वीकारणार नाही, अशी स्पष्ट भूमिका अमळनेर येथील होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांनी म्हटले आहे.

यापूर्वीच्या संमेलनाध्यक्षांप्रमाणे तुम्हीही सरकारला खडेबोल सुनावणार का?, या प्रश्नावर माध्यमांशी बोलताना डॉ. रवींद्र शोभणे यांनी आपली परखड भूमिका स्पष्ट केली. संमेलनात मी माझे भाषण अलिकडच्या काळातील सांस्कृतिक, वाङ‌्मयीन तसेच सामाजिक प्रश्नांच्या अनुषंगाने मांडणी करून ती साहित्यप्रेमी आणि राजकारण्यांपुढे ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. शोभणे पुढे म्हणाले की, साहित्यिक रोखठोक भूमिका घेण्यास कचरतात, हे आपल्याला मान्य नसून दुर्गा भागवत, पु. ल. देशपांडे, वसंत बापट अशा कितीतरी महान साहित्यिकांनी रोखठोक आणि स्पष्ट भूमिका घेतलेल्या आहेत. दरम्यान, वैदर्भीय प्रतिभेची दखल नेहमी उशिरा घेतली जात असल्याचा आरोपही आपल्याला मान्य नाही. मुळात साहित्यात मी प्रांतभेद मानत नाही. विदर्भातील अनेक लेखकांना पश्चिम महाराष्ट्राने मान्यता दिली. यानंतर विदर्भाने त्यांना स्वीकारले, असे डॉ. शोभणे यांनी स्पष्ट केले.

महानगरांतील तरुण पिढीचा इंग्रजीकडे ओढा असला तरी ग्रामीण भागात मराठी साहित्य वाचणारी नवी पिढी उदयाला येत असून ती खूप आश्वासक असल्याचे मत शोभणे यांनी सांगितले. साहित्याच्या प्रांतात जातीय अस्मिता तीव्रतेने व्यक्त होत आहेत, याकडे लक्ष वेधले असता शोभणे म्हणाले की, वस्तुस्थिती काहीही असली तरी या क्षेत्रात सामंजस्य आणि सौहार्दाने एकत्र येणे आणि एकमेकांप्रती आदर ठेवून काम करण्याची खरी गरज आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news