

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : वाघाच्या कातडीची तस्करी करणा-या दोन आरोपींना नागपूर व भंडारा वन विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई पवनी येथे बुधवारी करण्यात आली. दोन्ही आरोपी चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
गेल्या काही दिवसापासून पवनी येथे वाघाच्या कातडीची तस्करी होणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. वन विभागाने बुधवारी सकाळी सापळा रचून तस्करी करणा-या दोन्ही आरोपींना अटक केली. निलेश सुधाकर गुजराथी (वय ३३, रा. चंद्रपूर) आणि विकास बाथोली बाथो (३१, रा. चंद्रपूर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून वाघाची कातडी व दुचाकी (क्र. एमएच ३४ सीबी २७१७) जप्त करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या विविध कलमांन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई मुख्य वनसंरक्षक (प्रा) नागपूर रमेश कुमार, नागपूरचे उपवनसंरक्षक भारत सिंह हांडा, भंडाराचे उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात विभागीय वन अधिकारी (दक्षता) पी. जी. कोडापे, पवनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल बारसागडे, बुटीबोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे, निलेश तवले, दिनेश पडवळ, पोरेते, थुले, वासनिक आदींनी केली. पुढील तपास भंडाराचे सहाय्यक वनसंरक्षक वाय. व्ही. नागुलवार करीत आहेत.