भंडारा : मद्यपी मुलाचा आईवर तलवारीने हल्ला; स्वत: दिली गुन्ह्याची कबुली | पुढारी

भंडारा : मद्यपी मुलाचा आईवर तलवारीने हल्ला; स्वत: दिली गुन्ह्याची कबुली

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : शहरातील महात्मा गांधी चौकात घडलेल्या खुनप्रकरणाची चर्चा ताजी असताना लगेचच या चौकाच्या काही अंतरावर असलेल्या शहिद भगतसिंग वॉर्डात एका मद्यपीने आपल्या आईवर तलवारीने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या घटनेने भंडारा शहर पुन्हा एकदा हादरले आहे. यानंतर गांजा व अन्य अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या तरुणांबाबत शहरात चिंता व्यक्त केली जात आहे.

मुन्ना मनोहर निनावे (वय ३०, रा. भगतसिंग वॉर्ड) असे मुलाचे नाव आहे. तर माधुरी निनावे (वय ६०) असे जखमी आईचे नाव असून तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहरातील छोटा बाजार चौकातील शहिद भगतसिंग वॉर्ड येथे माधुरी निनावे ही मुलांसोबत राहत होती. तिचा मुलगा मुन्ना याला दारूचे व्यसन जडल्याने तो पैशांसाठी नेहमी आईला त्रास देत होता. दारू पिऊन आईला शिवीगाळ आणि मारहाणसुद्धा तो करीत होता. दरम्यान आज शुक्रवारी (दि.२ ) रोजी सकाळी तो दारूच्या नशेत तलवार घेऊन घरी आला आणि त्याने त्याच्या आईच्या पोटावर आणि गळ्यावर सपासप वार केले.

यानंतर त्याची आई माधुरी रक्ताच्या थारोळ्यात पडली. गंभीररित्या जखमी झालेल्या माधुरीला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, मुन्नाने तलवार जवळच्या नालीत फेकून दिली आणि स्वत: पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

अमली पदार्थांचा बाजार मांडणाऱ्याचा बंदोबस्त कधी होणार?

शहरात दिवसेंदिवस अल्पवयीन तथा तरुणांमधील गुन्हेगारी वृत्तीमुळे चिंतेचे वातावरण आहे. शहरात वाढलेला अमली पदार्थांचा बाजार यामागील कारण असल्याचे स्पष्ट आहे. पोलिसांना अमली पदार्थ विकणारे कोण? याची माहिती असतानासुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. याच कारणांमुळे अमली पदार्थ विकणारे आणि सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातूनच गुन्हेगारी वाढत आहे. आता तरी पोलिस या अंमली पदार्थांचा बाजार मांडणाऱ्याचा बंदोबस्त करतील काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

हेही वाचा : 

 

Back to top button