भंडारा शहरात थरार: शीतपेय विक्रेत्याचा खून; जमावाच्या हल्ल्यात मारेकऱ्याचा मृत्यू

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : जुन्या वादातून एका शीतपेय विक्रेत्याचा चाकूने वार करुन खून करण्यात आला. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने मारेकऱ्याला केलेल्या मारहाणीत त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही थरारक घटना रविवारी (दि. २८) रात्री भंडारा शहरातील गजबजलेल्या गांधी चौकात घडली. या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अमन नंदुरकर (वय २३, रा. गांधी चौक) या तरुणाचे गांधी चौकात आदर्श टॉकीजसमोर लस्सीचे दुकान आहे. शनिवारी अमनच्या लस्सी सेंटरवर विकी मोगरे आणि ईएल चर्च रोड येथील विष्णू उर्फ बा आले होते. त्यांनी अमनसोबत भांडण करून त्याला चोप दिला होता. भांडण झाल्यावर अमन दुकान बंद करून आपल्या घरी गेला. रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास पुन्हा विकी मोगरे, विष्णू , अभिषेक साठवणे त्याच्या काही साथीदारांसह वाद मिटवण्यासाठी अमनच्या दुकानात पोहोचले.

परंतु, तिथे वाद मिटविण्याऐवजी वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात संशयित आरोपी अभिषेक साठवणे याने त्याच्या जवळील चाकू अमनच्या पोटात भोकसला. त्यामुळे अमन रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनास्थळी उपस्थित अमनचे वडील, काका, त्याच्या मित्रांनी अभिषेकच्या हातातील चाकू हिसकावला. हा प्रकार पाहून परिसरातील जमाव संतप्त झाला. जमावाने अभिषेकला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचे साथीदार पळून गेले.

जखमी अवस्थेत अमन आणि अभिषेकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे अमनला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे जमाव पुन्हा संतप्त झाल्याने हल्लेखोर अभिषेकला लाथाबुक्क्यांनी दवाखान्यातच बेदम मारहाण केली. त्यामुळे घाबरलेल्या रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी परिस्थिती हातळत जमावाला शांत केले. पोलिस अधीक्षक लोहित मतानी आणि शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष बारसे यांनी जिल्हा रुग्णालय आणि घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी हल्लेखोर अभिषेक साठवणे याला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान अभिषेकचा आज (दि.२९) मृत्यू झाला.

या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात आणि गांधी चौकात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

पोलिसांचा वचक आहे कुठे?

ज्या गजबजलेल्या गांधी चौकात खुनाचा थरार घडला. त्याठिकाणी पोलिस स्टेशन आहे. परंतु, सदर पोलिस ठाण्याच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने पोलिस ठाणे दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. आधी पोलिस ठाणे असल्याने गांधी चौकात पोलिसांचा वचक होता. आता मात्र रात्रभर या चौकात तरुणांची रेलचेल असते. हे तरुण रात्रभर चौकात धिंगाणा घालतात. या चौकात पोलिसांची नियमित गस्त असती, तर ही घटना टाळता येऊ शकली असती, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news