Aaditya Thackeray: भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे झळकले बॅनर्स, चर्चांना उधाण | पुढारी

Aaditya Thackeray: भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे झळकले बॅनर्स, चर्चांना उधाण

पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाकरे गटाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सध्या नागपूर जिल्ह्यातील कोराडी, रामटेक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बॅनर्सवर त्यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे. रामटेक तालुक्यातील कन्हान, मनसर या भागात हे बॅनर्स झळकल्याचे पहायला मिळत असून युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून ते लावण्यात आल्याची माहिती आहे.

राज्यात सध्या महाविकास आघाडीत (MVA) राजकीय वादळ घोंघावत आहे. जागावाटपावरून रणकंदन सुरू आहे. या संपूर्ण परिस्थितीत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (aaditya thackeray) मात्र भलतेच सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. ते सध्या नागपूर जिल्ह्याचा दौरा करत आहेत. कोराडी, रामटेक परिसरात होणाऱ्या नव्या ऊर्जा प्रकल्पामुळे या भागात प्रदूषणाची समस्या निर्माण होणार असल्याचा आरोप येथील काहींकडून केला जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर जनतेची मते जाणून घेण्यासाठी हा दौरा केल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी (aaditya thackeray) दिली. दरम्यान, या दौ-या निमित्त झालेल्या बॅनर्सवर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आदित्य यांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा केला आहे. या उल्लेखामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

या आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख त्यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर्सच्या माध्यमातून केला होता. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची मविआमध्ये चर्चा सुरू झाल्याचे बोलले जात आहे. 2024 मध्ये ज्या पक्षाचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असे समीकरण असण्याची शक्यता आहे. या बॅनरमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Back to top button