वर्धा : १ जूनपूर्वी कपाशी बियाणे विक्री केल्यास बियाणे परवाना होणार रद्द!  | पुढारी

वर्धा : १ जूनपूर्वी कपाशी बियाणे विक्री केल्यास बियाणे परवाना होणार रद्द! 

वर्धा,  पुढारी वृत्तसेवा : गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १ जून नंतरच कपाशीचे बियाणे विकण्याच्या सूचना कृषी विभागाच्या निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रक विभागाने दिल्या आहेत. १ जूनपूर्वी कपाशी बियाण्याची विक्री केल्याचे आढळल्यास परवाना निलंबीत करण्याची कारवाई केली जाईल, अशा सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
अनेक जण मान्सूनपूर्व कपाशीची लागवड करतात. मान्सूनपूर्व कापसाची लागवड केल्यास उत्पादन वाढते, असे अनेक शेतकरी बोलतात. यातून कापूस उत्पादक पट्टयात मान्सूनपूर्व लागवड वाढली आहे. याचा दुष्परिणाम म्हणून गुलाबी बोंडअळीचा प्रकोप वाढला आहे. चक्र थांबविण्यासाठी मान्सूनपूर्व कपाशी लागवड थांबविण्याच्या सूचना कृषि विभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

विक्रीबाबत अशा आहेत सूचना

कंपनीकडून उत्पादित कपाशी बियाणे १० मेपासून वितरकांना सुपुर्द करणार, वितरक हे बियाणे १५ मे नंतर किरकोळ विक्रेत्यांना विकणार आहेत. किरकोळ विक्रेते १ जूननंतरच बियाण्याची विक्री शेतकऱ्यांना  करतील.
१ जूनपूर्वी कपाशी बियाणे शेतकऱ्यांना विक्री करु नये तसेच शेतकऱ्यांनीसुध्दा मान्सूनपूर्व कपाशी पिकाची लागवड करु नये, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
१ जूनपूर्वी कपाशी बियाण्यांची विक्री करू नये. तसे आढळल्यास संबंधिताचा परवाना रद्द केल्या जाईल, असे गुणवत्ता नियंत्रक परमेश्वर घायतिडक यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button