बुलढाणा : खामगावात महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडून अवैध देशी कट्टा, पाच काडतुसे जप्त | पुढारी

बुलढाणा : खामगावात महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडून अवैध देशी कट्टा, पाच काडतुसे जप्त

बुलढाणा,पुढारी वृत्तसेवा : खामगाव शहरातील एका वसतीगृहात राहणा-या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ताब्यातून पोलीसांनी एक देशी बनावटीचा अवैध कट्टा व पाच जीवंत काडतूसे जप्त केली आहेत. सदर विद्यार्थी देशी कट्टा बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून एपीआय गौतम इंगळे यांच्यासह पोलीस पथकाने खामगाव शहरातील वाडी परिसरात असलेल्या एका वसतीगृहातील रूम नं.२०५ची पंचासमक्ष झडती घेतली.

यावेळी संशयित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या रूममध्ये लोखंडी पलंगाखालील काळ्या रंगाच्या बैगमध्ये नितीन राजू भगत (वय२२,रा.आंबेटाकळी ता.खामगाव)या नावाची शैक्षणिक प्रमाणपत्रे व पिस्टलसारखा दिसणारा एक देशी बनावटीचा अवैध कट्टा व पाच जीवंत काडतूसे आढळून आली.

यावेळी पोलीस पथकाने नितीन राजू भगत याला ताब्यात घेतले व त्याच्या बैगमध्ये मिळून आलेला देशी कट्टा व काडतूसे जप्त केली आणि गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडे अवैध देशी कट्टा कसा आला? कट्टा बाळगण्याचा त्याचा हेतू काय? याविषयी अधिक तपास पोलीस निरीक्षक शांतीकुमार पाटील करीत आहेत.

Back to top button