अकोला: संचारबंदी निर्बंधात अंशतः बदल, जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश | पुढारी

अकोला: संचारबंदी निर्बंधात अंशतः बदल, जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश

अकोला, पुढारी वृत्तसेवा : शहरातील चार पोलीस स्टेशन्सच्या हद्दीत १३ मे पासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदी निर्बंधात अंशतः बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज (दि.१५) दिले आहेत.

आदेशात नमूद केल्यानुसार, अकोला शहरातील सिटी कोतवाली व रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत लावण्यात आलेले संचारबंदी निर्बंध हटविण्यात येऊन जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जुने शहर व डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी शिथिल करून १५ मे पासून सायं. ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर १५ मे च्या रात्री ८ ते १६ मे च्या सकाळी ८ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १६ मेपासून पुढील आदेशापर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत जमावबंदी तर रात्री ८ ते सकाळी ८ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

याशिवाय जमावबंदी आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी निमा यांनी सांगितले आहे.

Back to top button