महाविकास आघाडी २०२४ मध्ये सर्वात मोठा पक्ष असेल : सुषमा अंधारे | पुढारी

महाविकास आघाडी २०२४ मध्ये सर्वात मोठा पक्ष असेल : सुषमा अंधारे

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : भाजपबद्दलची नकारात्मकता वारंवार वेगवेगळ्या निवडणुकांच्या माध्यमातून समोर येत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा रोवला. बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपचा बाजार उठला आहे. 2024 मध्ये महाविकास आघाडी सर्वात मोठा पक्ष नक्कीच असेल, असा विश्वास ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बोलून दाखविला. एका सभेसाठी त्या रामटेक येथे आल्या होत्या, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अंधारे म्हणाल्या की, सुधीर मुनगंटीवार यांचे वक्तव्य हे भाजपचे राजकारण कसे अनैतिक आहे, याचे समर्थन करणारे आहे. कर्नाटकमध्ये द्वेषमुलक राजकारणाला राहुल गांधींनी शांतपणे उत्तर दिले. हा देश शांतीप्रिय देश आहे. कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 110 ते 115 जागा मिळतील, असे बोलले जात असताना 136 जागा मिळवल्याने भाजपविषयीची लोकांची नकारात्मकता दिसून येत आहे.

दरम्यान, लहान पोरांवर आम्ही उत्तर देत नाही, आणि त्यांना गांभीर्याने घेत नाही, असा टोला आमदार नितेश राणे यांच्यावर लगावला.
अनिल जयसिंघनिया प्रकरण थंड झाले की काय? कारण जयसिंघनिया प्रकरणाने डोकं वर काढल्यावर अमृता फडणवीस गायब झाल्या होत्या. त्या प्रकरणावर बोलण्याची गरज आहे, म्हणजे पुढील सहा महिने अजून त्या शांत बसतील, असा टोलाही लगावला. महाविकास आघाडी म्हणून जर आपण एकत्र लढलो. तर मोदी है तो मुमकीन है… हा जो भ्रमाचा भोपळा आहे, जो कर्नाटकमध्ये फुटला आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला निकाल दिसू शकतात, असा दावा अंधारे यांनी केला.

हेही वाचा 

Back to top button