राज्यात वारकरी विद्यापीठ उभारणार : मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा | पुढारी

राज्यात वारकरी विद्यापीठ उभारणार : मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा: वारकरी परंपरा ही महाराष्ट्राचे भूषण आहे. हा अनमोल ठेवा टिकवून ठेवण्यासाठी राज्यात वारकरी विद्यापीठाची उभारणी करणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इसरूळ (ता. चिखली) येथे संत चोखोबारायांच्या मंदिर कलशारोहण कार्यक्रमात केले. ह.भ.प. पुरूषोत्तम महाराज यांनी किर्तन सेवेच्या निधीतून संत चोखोबाराय यांचे भारतातील पहिले मंदिर इसरूळ गावात उभारले आहे. या भव्य मंदिराचा कलशारोहण सोहळा आज (दि.१२) दुपारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

गुरुवारच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांचा पहिलाच दौरा व सार्वजनिक कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यातील इसरूळ गावी झाला. आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, राजकारण व सत्ताकारणापेक्षाही संत परंपरेचे महत्व आहे. म्हणूनच साहेबांपेक्षा महाराज मोठे असतात. राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, गेल्या सात-आठ महिन्यांपासून सरकारचे काय होणार? याविषयी चर्चा होती. आम्ही जे जे केले ते कायद्याच्या चौकटीतून केले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिला आहे.

राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून आम्ही घेतलेले निर्णय हे सर्वसामान्य जनतेसाठी घेतले होते. यापुढेही आपण कार्यकर्ता म्हणूनच राहू, असेही ते म्हणाले. या कलशारोहण सोहळ्याला मंत्री संदिपान भुमरे, आमदार श्वेताताई महाले, हरिभाऊ बागडे, नारायण कुचे, संजय रायमूलकर, संजय गायकवाड, किरण सरनाईक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button