नागपूर : समलैंगिक तरुणीने पालकांची माफी मागत उचलले टोकाचे पाऊल | पुढारी

नागपूर : समलैंगिक तरुणीने पालकांची माफी मागत उचलले टोकाचे पाऊल

नागपूर : पुढारी वृत्तसेवा: समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्यावी की नाही, यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या निमित्ताने देशभर चर्चा सुरु असताना नागपुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपण लेस्बियन असल्याचा दावा करणाऱ्या तरुणीने मानसिक तणावातून जीवन संपवल्‍याचे धक्‍कादायक घटना घडली आहे. संबंधित बी.एस. द्वितीय वर्षाला एका प्रतिष्ठित महाविद्यालयात शिकत होती. समलैंगिक असल्याने लग्नात अडचणी येण्याची व समाजाकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन झाले आहे. जीवन संपविण्‍यापूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्‍त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवतीचे कुटुंब मूळ उत्तर प्रदेशातील आहे. ते नागपुरात अनेक वर्षांपासून राहते. आपण समलैंगिक असल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने याबाबत कुटुंबीयांना कल्पना दिली. त्यावेळी तिच्या आईवडीलांना मोठा धक्का बसला. तेव्हापासून कुटुंबातील लोक तिच्यावर बारीक लक्ष ठेवून असायचे. तिची समजूत घालण्याचे प्रयत्नही करण्यात आले. पण, त्याचा उपयोग झाला नाही.
कुटुंबीयांनी तरुणीवर लग्नासाठी दबावही टाकला जात होता. रविवारी दुपारी तिचे आईवडील व भाऊ बाहेर गेले होते. यावेळी तिने जीवन संपवले. कुटुंबीय घरी आल्यावर ही बाब उघडकीस आली. त्‍यांनी तिला तातडीने मेयो इस्पितळात नेले. तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. तरुणीने जीवन संपविण्‍यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवलेली होती. स्वत:च्या इच्छेनुसार जीवन जगता येत नसल्याने हे कठोर पाऊल उचलत असल्याचे तिने नमूद केले.याशिवाय या कृत्याबद्दल पालकांची माफी देखील मागितली आहे.

हेही वाचा 

Back to top button