Aadhaar Card : विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीमध्ये नागपूर जिल्हा मागे; १३ हजार विद्यार्थ्यांकडे कार्डच नाही | पुढारी

Aadhaar Card : विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीमध्ये नागपूर जिल्हा मागे; १३ हजार विद्यार्थ्यांकडे कार्डच नाही

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्य शालेय शिक्षण विभागाने स्टुडंट्स पोर्टलवर ३० एप्रिलअखेर विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीकरण आणि प्रमाणीकरण संच मान्यतेसाठी बंधनकारक केले होते. संकेतस्थळातील तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊनची समस्या असे अडथळे असल्याने नागपूर जिल्हा राज्यात सर्वात शेवटी होता. नागपूर जिल्हा राज्यात २२ व्या क्रमांकावर असून, जिल्ह्यातील सुमारे ८ लाख ३४ हजार ३३२ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९० हजार ८०४ विद्यार्थी अद्यापही आधार अपडेट नसल्याचे वास्तव आहे. कमी पटसंख्येमुळे शिक्षकांची पदे संचमान्यतेत कमी होण्याचा धोका आहे.

विद्यार्थीसंख्येनुसार शिक्षण विभागांकडून शिक्षक पदांना मान्यता (संच मान्यता) देण्यात येते. बनावट बोगस विद्यार्थी दाखवून शिक्षक पदे भरण्यात आल्याचे काही वर्षांपूर्वी उघडकीस आले. त्यामुळे राज्यातील सर्व माध्यमांच्या शासन मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाइन आधार नोंदणी करण्याची मोहीम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतली. इयत्ता पहिली ते बारावी अखेरच्या अनेक विद्यार्थ्यांनी आधार कार्ड अजूनही काढलेली नाहीत. अनेकांनी ती अद्ययावत केलेली नाहीत. शाळेतील नोंदणीशी विद्यार्थ्यांच्या आधारवरील माहिती जुळत नसल्याने सर्व्हरला वारंवार अडथळे येत आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभाग व संस्थाचालक आधार डेटा बेस कामाचा वारंवार आढावा घेत आहेत.

आधारकार्ड असूनही नाव, चुकीचे स्पेलिंग, लिंग, जन्मतारीख यात बदल असल्याने मिसमॅचची समस्या उभी राहिली आहे. जिल्ह्यात एकूण ८,३४,३३२ विद्यार्थी आहेत. त्यापैकी ८,२०,५७१ जणांकडे आधार कार्ड असून १३ हजार ७६१ विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही. युडीआयडीकडून ७,६२,१६१ विद्यार्थ्यांचे आधार तपासले. त्यापैकी ६,४३,५२८ आधार कार्ड व्हॅलिड ठरलेत. १,१८,६३३ आधारकार्ड इनव्हॅलिड ठरले ५८ हजार ४१० आधार शाळा स्तरावर पेंडिग असल्याचे राज्याच्या अहवालातुन पुढे आले. जिल्ह्यात एकूण १,९०,८०४ आधार कार्डचे काम पेंडिग असून, जिल्ह्यातील ७७.१३ टक्के आधारकार्डचे काम व्हॅलिड ठरले.

शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण करण्याबाबत आदेश बजावूनही नागपूर शहर व ग्रामीण भागांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी अद्ययावतीकरण पूर्ण झालेले नाही. गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या बोटांच्या ठशासह आधार नोंदणी करणे काही शाळांना, पालकांना शक्य झाले नाही. विद्यार्थ्यांचे तातडीने आधार दुरुस्ती करावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी बैठकीत केले आहे.

Back to top button