Chandrapur : चिमूर जिल्हा निर्मितीला नागभीडमधून प्रचंड विरोध : सोशल मीडियावर रंगली चर्चा

Chandrapur : चिमूर जिल्हा निर्मितीला नागभीडमधून प्रचंड विरोध : सोशल मीडियावर रंगली चर्चा

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : निवडणुका जशा जवळ येत आहेत, त्याप्रमाणे राजकारणासोबतच जिल्हा निर्मितीच्या चर्चा जोरात सुरू झालेल्या आहेत. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातून एक स्वतंत्र जिल्हा व्हावा, ही येथील नागरिकांची फार जुनी मागणी आहे. परंतु कोणता जिल्हा निर्मित व्हावा, याकरिता मतभेद असून सोशल मीडियावर चर्चांनी जोर धरला आहे. त्यामुळे जिल्हा झालाच तर नागभीड, ब्रम्हपूरी  की चिमूर जिल्हा व्हावा ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. सत्ताधारी असो की विरोधक यांची पसंती तर चिमूरच असल्याची वास्तव्यदर्शी  परिस्थिती आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या 15 तालुके आहेत.

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात सध्या 15 तालुके आहेत. त्यापैकी नागभीड, ब्रम्हपूरी, चिमूर आदी तालुक्यांचा समावेश होतो. या तिन्ही तालुक्यांना भंडारा, गडचिरोली व वर्धा जिल्हा लागून आहे. चिमूर एका बाजूला तर एका बाजूला ब्रम्हपुरी आहे. नागभीड हे दोन्ही तालुक्याचे मध्ये वसले आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्याला जोडणारे केंद्रस्थान म्हणून नागभीडकडे पाहिले जाते. ब्रिटीश काळापासून 350 एकर जागेमध्ये रेल्वे जंक्शन आहे. नागपूर महामार्गाला लागून एमआयडीसी परिसर आहे. रस्ते महामार्ग व रेल्वे महामार्गाला लागून आहे. केंद्रस्थानी व कमी अंतरामुळे कार्यालयीन कामाकरीता नागरिकांना नागभीड सोईस्कर ठिकाण आहे.

नागभीड परिसरात मँगनीजचे मुबलक साठे

केंद्र सरकारच्या भूसर्वेक्षणात नागभीड परिसरात मँगनीजचे मुबलक प्रमाणात साठे उपलब्ध असल्याची नोंद आहे. ब्रिटीश कालीन घोडाझरी तलाव याच तालुक्यात आहे. नुकतेच येथील घोडाझरी परिसरातील जंगलाला घोडाझरी अभयारण्याचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे घोडाझरी स्थळावर येणारे पर्यटकांना अभयारण्याच्या पर्यटनाची मोठी मेजवाणी आहे. सोबतच मोठा महसूल या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत जात आहे.

राजकीयदृष्या्य या तालुक्याचा विचार केला. तर बळीराम पाटील गुरपुडे व बाबुरावजी भेंडारकर यांचे व्यतिरिक्त कुणालाही आमदार होण्याचे संधी नागभीड तालुक्यात  अद्याप मिळाली नाही. ब्रम्हपुरीमध्ये बाबासाहेब खानोरकर, उद्धव शिंगाडे, नामदेवराव दोनाडकर व अतुल देशकर यांनी तालुक्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. विजय वड्डेटीवार यांनी चिमूर विधानसभेचे क्षेत्राचे प्रतिनिधीत्व केले आहे. सध्या या क्षेत्राचे आमदार म्हणून किर्तीकुमार भांगडिया कार्यरत आहेत. दोन्ही एक सत्ताधारी व एक विरोधक म्हणून दोन्ही आमदारांना नागभीड तालुक्यातील जनतेने संधी दिली आहे.

Chandrapur : नागभीड जिल्हा निर्मिती व विकासाबाबत लोकप्रतिनिधींची उदासीनता

मात्र, अनेक वर्षांपासून नागभीड जिल्हा निर्मिती व विकासाबाबत लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे. एकदा चिमूर येथे काँग्रेसच्या मेळाव्यात आमदार विजय वड्डेटीवार यांनी चिमूर जिल्हा निर्मितीची  मागणी केली  होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तांत्रिक बाबींचा  विचार करूनच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. विजय वड्डेटीवारांनतर चिमूरात भाजपचे किर्तीकुमार भांगडिया आमदार झाले. त्यांनी तर जिल्हा होईल तर चिमूरच अशी घोषणा करून चिमूरला पसंती दर्शविली. चिमूर जिल्हा होणारच ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे सांगितले. भांगडिया हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. आजी माजी आमदारांची नागभीड जिल्ह्याबाबत नेहमीच उदासीनता राहिली आहे. नागभीड जिल्हा व्हावा, या करीता सर्वपक्षीय पदाधिकारी कधीच सक्रीय दिसले नाहीत.  नागभीड व तळोधी बाळापूर येथे धान्याची मोठी बाजारपेठ आहे. विदर्भातील धान्याचे कोठार म्हणून नागभीडला ओळखले जाते. तर एचएमटी तांदळाची जात याच तालुक्यात विकसित करण्यात आली आहे.

१ मेरोजी नवीन जिल्ह्याची पोस्ट सोशल मीडियावर झळकली. आणि जिल्हा निर्मिती स्पर्धा सुरू झाली. चिमूर जिल्हा होण्याची मागणी झाल्यानंतर सोशल मीडियावर या मागणीला प्रचंड विरोध होऊ लागला आहे. चिमूरच का? असा प्रश्न विचारला जात आहे. नागभीड का होऊ शकत नाही ?, सत्ताधारी व विरोधक आमदारांना नागभीड जिल्हा का नको आहे ? असा प्रश्न विचारला जात आहे. चिमूरची मागणी होत असली तरी नागभीड सर्वसामान्य जनतेला परवडणारे ठिकाण असल्याचे नेटकरी  पटवून देत आहेत. भविष्यात आमदार विजय वड्डेटीवार व आमदार किर्तीकुमार भांगडिया यांना येथील  जनतेला नागभीड जिल्हा निर्मितीबाबत आपली भूमिका स्पष्ट  करावी लागणार आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news