रामदास आठवले म्हणतात; आरपीआय ऐक्याचा विषय आता संपला | पुढारी

रामदास आठवले म्हणतात; आरपीआय ऐक्याचा विषय आता संपला

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

आरपीआय ऐक्याचा विषय आता संपलेला आहे. अनेकदा प्रयत्न करूनही कोणी एकत्र यायला तयार नाही. त्यामुळे हा विषय आता संपलेला आहे, असे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नागपूर येथे पत्रपरिषदेत जाहीर केले.

‘दलित पँथरला ५० वर्षे होणार आहे. या निमित्त दलित पँथरचे पुनरूज्जीवन करणार आहे. कारण देशात त्याची गरज असल्याची माहिती आठवले यांनी दिली. यूपीमध्ये आरपीआय ब्राम्हण संमेलन घेणार असून यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण दिल्याचे आठवले यांनी सांगितले. नितीन गडकरींनी चांगले रस्ते बांधले. परंतु राज्यातील रस्त्यांवर खड्टे पडले आहे. ते बुजवले नाही तर सरकार खड्ड्यात जाईल, असे आठवले म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारे टीका टिप्पणी करणे बरोबर नाही. त्यांच्या पदाला ते शोभत नाही. ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून छापा टाकून काटा काढण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने करण्यात येतो. पण आम्ही छापा टाकून काटा काढत नाही, तर काटा काढून मग छापा टाकतो, असे आठवले म्‍हणाले.

आमच्यामुळे भाजपला उत्तर प्रदेशात फायदा होईल : रामदास आठवले

एकटे निवडणूक लढल्यास पराभव होण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे पडण्यासाठी उभे राहण्यापेक्षा निवडून येण्यासाठी कशा पद्धतीने उभे राहता येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर प्रदेशात भाजप आरपीआयला त्या निवडणुकीत सोबत घेईल, याची शक्यता वाटत आहे. त्यामुळे भाजपच्या साथीने आम्ही उत्तर प्रदेशात यश मिळवू. भाजपला आमचा फायदाच होणार आहे. कारण पश्‍चिम बंगालमध्ये कॉंग्रेस आणि कम्युनिस्टांना फारशी मते मिळाली नाही आणि भाजपच्या ९५ जागा या फक्त ५०० ते १५०० मतांच्या फरकाने हरलेल्या आहेत. हा फरक जर भरून काढता आला असता, तर भाजपला १८० ते १९० जागांवर विजय मिळाला असता, असे आठवले म्हणाले.

हेही वाचा : शेतकरी आंदोलन : सीमांवरून शेतकऱ्यांना हटवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

जम्मू काश्‍मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर तेथे तिरंगा फडकला आहे. मी दोन वेळा जम्मू आणि काश्‍मीरला जाऊन आलो. तेथील मुस्लीम लोकांनी माझे चांगले स्वागत केले. जनतेमध्ये चांगले वातावरण आहे. केवळ नेत्यांकडूनच विरोध होतो आहे. आतंकवादी तेथे पुन्हा पुन्हा हल्ले करत आहेत. त्यामुळे तेथे सर्जिकल स्ट्राईक करण्याची आवश्‍यकता पडू शकते, असे अमित शहा म्हणाले. पण त्या स्ट्राईकचा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीशी काही संबंध नाही, असे आठवले यांनी सांगितले.

Back to top button