यवतमाळ : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात मविआला कौल | पुढारी

यवतमाळ : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात मविआला कौल

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात सात बाजार समित्यांच्या निवडणुकीत मविआला कौल मिळाला आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील आठ बाजार समितीच्या निवडणुकीतही मतदारांनी मविआलाच पसंती दिली आहे.

दारव्हा, बोरी अरब, कळंब, राळेगाव, झरी जामणी, मारेगाव, आर्णी आणि घाटंजी या आठ बाजार समितीसाठी रविवारी मतदान झाले. पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाने १८ पैकी १६ जागा जिंकत दारव्हा राखले. तर राष्ट्रवादीच्या सोबतीने बोरीअरबमध्येही शिंदे गटाकडे बाजार समितीची सत्ता राखली असली तरी झरी, मारेगाव, कळंब, राळेगाव आदी बाजार समित्यांमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीने एकतर्फी सत्ता मिळविली आहे.

झरी बाजार समितीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार आणि शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने १८ पैकी १८ जागा जिंकत एकतर्फी विजय मिळविला आहे. कळंबमध्ये काँग्रेसविरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. येथे काँग्रेसने सर्व १८ जागा जिंकत भाजपला धोबीपछाड दिली. काँग्रेसचे प्रवीण देशमुख आणि प्रा. वसंत पुरके हे दोन गट एकत्र आल्याने काँग्रेस येथे एकतर्फी विजय मिळविता आला.

राळेगावमध्येही काँग्रेसने वर्चस्व राखले असून, तेथे बाजार समितीची सत्ता मिळाली आहे. काँग्रेसविरुद्ध भाजप-राष्ट्रवादी-शिंदे गट उद्धव सेना अशी लढत येथे रंगली होती. काँग्रेसने सर्वाधिक १४ जागा जिंकल्या. तर भाजपला तीन तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले.

घाटंजी बाजार समितीमध्ये चुरशीची लढत झाली. पारवेकर गटाने विजयाचा झेंडा फडकविला आहे. येथे या गटाला दहा जागा मिळाल्या. तर विरोधी लोणकर-मोघे गटाला आठ जागांवर समाधान मानावे लागले. दारव्हा बाजार समितीत शिंदे गटाने १८ पैकी १६ तर महाविकास आघाडीला दोन जागा मिळाल्या. बोरीअरबमध्येही शिंदे गट आणि राष्ट्रवादी युती प्रभावी ठरली. येथे शिंदे गटाला दहा जागा मिळाल्या. राष्ट्रवादीचे तीन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध आले होते. येथे विरोधी काँग्रेस-भाजपने पाच जागा जिंकल्या.

हेही वाचा : 

Back to top button