वर्धा जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळासह गारपिटीचा तडाखा; ६१ मेंढ्यांचा मृत्यू | पुढारी

वर्धा जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळासह गारपिटीचा तडाखा; ६१ मेंढ्यांचा मृत्यू

वर्धा; पुढारी वृत्तसेवा: वर्धा जिल्ह्यात बुधवारी (दि. २६ एप्रिल) रोजी रात्री वादळासह अवकाळी पाऊस, गारपिटीचा तडाखा बसला. या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विजांच्या कडकडाटासह आलेल्या अवकाळी पावसादरम्यान काही भागात गारपीटही झाली. त्यात देवळी तालुक्याच्या अंदोरी परिसरात जास्त नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. आंजी येथे गारपिटीमुळे ६१ मेंढ्यांचा मृत्यू झाला. देवळी तालुक्यात १२९ घरांचे अंशत: नुकसान झाले. अनेक ठिकाणी फळपिकांचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. अंदोरी येथे वीज तारा तुटल्याने विद्युत प्रवाह खंडीत झाला. समुद्रपूर तालुक्यात वीज पडून बैलजोडी ठार झाली.

बुधवारी (दि.२६) विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. देवळी तालुक्यात जवळपास २१ गावांमध्ये १२९ घरांचे अंशत: नुकसान झाले. सोळा गोठ्यांचे नुकसान झाले. २१ हेक्टरमधील शेतीतील पिकांचे देखील नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आंजी येथील शेतात कळंब येथील मेंढ्या होत्या. रात्रीच्या सुमारास शेतात मोकळ्या जागेतील मेंढ्यांपैकी ६१ मेंढ्यांचा गारपिटीमुळे मृत्यू झाला. आंजी येथे घराचे छप्पर उडाल्याने घरात ठेवलेला कापूस व शेतमालाचे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वार्‍यामुळे रस्त्याच्या कडेला झाडे उन्मळून पडली आहेत. देवळी ते सोनेगाव आबाजी या मार्गावरील सकाळची वाहतूक प्रभावीत झाली होती.

तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. समुद्रपूर तालुक्यात वीज पडून बैलजोडी ठार झाली आहे. यासोबतच इतरही भागात नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. वादळ, गारपीटचा जबर फटका जिल्हयाला बसला.

Back to top button