घरगुती गॅस मिनी कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून छापे | पुढारी

घरगुती गॅस मिनी कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून छापे

धुळे, पुढारी वृत्तसेवा : घरगुती वापराचा गॅस वाहनांमध्ये भरण्याचा मिनी कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने उध्वस्त केला आहे. भर वस्तीत हा गॅस भरण्याचा हा काळाबाजार सुरू होता. गॅसचा काळाबाजार करण्यासाठी धुळे तालुक्यातील लामकानी येथील गॅस एजन्सी मालकाने सिलेंडरचा पुरवठा केला असल्याची बाब प्राथमिक तपासात उघड झाल्याने या गॅस एजन्सीच्या मालका विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गॅस एजन्सीच्या मालकावर कारवाई झाल्यामुळे आता गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

धुळे शहरातील देवपूर भागात प्रोफेसर कॉलनीमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून बेकायदेशीरपणे वाहनांमध्ये गॅस भरून मिळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण यांना मिळाली. त्यानुसार पथकाने गिरीश उर्फ बबलू पांडुरंग चौधरी यांच्या घरावर छापा टाकला असता या ठिकाणी प्रदीप रूपचंद सूर्यवंशी हा एम एच 18 डब्ल्यू 0 573 क्रमांकाच्या ओमनी गाडीमध्ये गॅस भरतांना आढळून आला. त्यामुळे गाडीचा मालक अमृत सुपडू वाघ याच्यासह गाडी देखील ताब्यात घेण्यात आली.

तसेच गिरीश चौधरी यांच्या घराची झडती घेतली असता घरातून गॅस भरलेले वीस सिलेंडर तसेच अठरा रिकामे सिलेंडर आढळून आले आहे. हे सर्व सिलेंडर भारत गॅस कंपनीचे असून प्रदीप सूर्यवंशी यांच्याकडे चौकशी केली असता त्याने हा व्यवसाय गिरीश चौधरी याचा असून जप्त करण्यात आलेले गॅस सिलेंडर हे धुळे तालुक्यातील लामकानी येथील हरी ओम गॅस एजन्सी येथून पुरवण्यात आल्याची माहिती दिली आहे.

पोलीस पथकाने एक लाख 35 हजार रुपये किमतीचे 38 सिलेंडर ,एक लाख रुपये किमतीची ओमनी कार आणि 15000 रुपये किमतीचे गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून प्रदीप सूर्यवंशी, अमृत वाघ आणि गिरीश चौधरी तसेच लामकानी येथील हरी ओम गॅस एजन्सीच्या मालका विरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-हेही वाचा 

चंद्रपूर: खाटेला हातपाय बांधून जावयाचा गळा कापून खून

पुणे: वानवडीत अनधिकृत होर्डिंगवर कारवाई

मौनी रॉय म्‍हणाली, यामूळे होते शनिवारची दुपार परिपूर्ण

Back to top button