

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून 100 कोटींची खंडणीची मागणी करणार्या व धमकी देणार्या कुख्यात जयेश पुजारी ऊर्फ शाहीर शाकीर शाह ऊर्फ कांथा (वय 35, रा. मंगलोर, कर्नाटक) याच्या दहशतवादी साथीदारांची आता नागपूर पोलिस थेट बेळगाव कारागृहात जाऊन चौकशी करणार आहेत.
नागपूर पोलिसांच्या तपासात रोज नवीन माहिती पुढे येत असल्याने या धमकीमागे नेमके कोण, याचा सूत्रधार हुडकून काढण्याचे आव्हान पोलिसासमोर आहे. कांथा बेळगाव कारागृहात असताना त्याची लष्कर-ए-तोयबाचा दक्षिण विभागाचा प्रमुख कॅप्टन नसीरसोबत ओळख झाली. नसीरनेच त्याला बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले अशी माहिती पुढे आली असून याच दरम्यान तो कारागृहातील अन्य दहशतवादी फहद कोया, अफसर पाशाच्या संपर्कात आला.