भंडारा: नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; दोघांना अटक | पुढारी

भंडारा: नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; दोघांना अटक

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : चुल्हाड येथे १० मार्च २०२३ रोजी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोघा नराधमांनी १८ वर्षीय पीडितेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघा नराधमांना सिहोरा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मुशरान जाहिद खान (वय २२, रा. गौसनगर, बालाघाट) रोहित कमल भोयर (वय २३, रा. कोरणी, जि. गोंदिया) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील कुंभली येथील १८ वर्षीय तरुणी ही जानेवारी २०२३ मध्ये बालाघाट येथे एका बगीच्यात एकटी बसली होती. संशयित आरोपी मुशरान जाहिद खान आणि रोहित कमल भोयर यांनी त्या तरुणीला एकटी पाहून रेल्वेमध्ये नोकरी करशील का, असे विचारून तिचा मोबाईल क्रमांक घेतला. १० मार्च २०२३ रोजी पीडितेचा जीवशास्त्र विषयाचा पेपर असल्याने बालाघाट येथे ती गेली. पेपर संपल्यानंतर शाळेबाहेर थांबलेल्या आरोपींनी तिला आमिष दाखवून गोंदिया येथे घेऊन गेले. त्यानंतर तिला चुल्हाड येथे आणून तिच्यावर अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी आरोपी रोहित भोयर याने बळजबरीने तिच्या डोक्यावर कुंकू लावून ओरिसा राज्यातील रेगांडी येथे घेऊन गेला.

त्यानंतर मुलींच्या आईवडिलांनी मुलीच्या शोधात रेगांडी गाठले असता मुलगी एका घराबाहेर दिसून आली. घडलेला प्रसंग तिने आईवडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी बालाघाट पोलीस स्टेशनमध्ये १२ एप्रिलरोजी तक्रार नोंदविली. मात्र, घटनास्थळ सिहोरा पोलीस स्टेशन हद्दीत येत होते. त्यामुळे सिहोरा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता १८ एप्रिल २०२३ पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास सिहोराचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र सहारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button