‘वज्रमूठ’ सभेवरून नागपुरात राजकारण पेटले; भाजपचे धरणे आंदोलन | पुढारी

'वज्रमूठ' सभेवरून नागपुरात राजकारण पेटले; भाजपचे धरणे आंदोलन

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: महाविकास आघाडीची ‘वज्रमुठ’ सभा  रविवारी (दि.१६) नागपुरातील दर्शन कॉलनी येथील मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. एकीकडे या सभेची तयारी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने आमदार कृष्णा खोपडे यांच्या माध्यमातून सभेला विरोध केला जात आहे. भाजप नेत्यांच्या नेतृत्वात स्थानिकांनी आज (दि. ११) पुन्हा धरणे आंदोलन, हनुमान चालिसा पठण केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.

राजकीय सभा घ्यायची असल्यास कुठले तरी मैदान घ्यावेच लागेल, अशा शब्दात महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांनी भाजपला  प्रत्‍युत्तर दिले. नागपुरातील ‘वज्रमुठ’ सभेची जबाबदारी असलेले माजी मंत्री सुनील केदार, नागपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार अभिजीत वंजारी यांच्यासह स्थानिक नेत्यांनी या मैदानावर पाहणी केली. सोबतच प्रचार रथ शहरात फिरत आहेत. त्यावर देखील केडीके कॉलेजजवळ दर्शन कॉलनी मैदान असाच सभास्थळाचा उल्लेख करण्यात आला आहे. महाविकास आघाडी याच मैदानावर सभा घेण्यावर यावर ठाम असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे.

मैदानाची दुर्दशा टाळण्यासाठी अन्य ठिकाणी सभा घेण्याची भाजपची मागणी

भाजप पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सर्वप्रथम सभेच्या ठिकाणाला विरोध दर्शविला होता. यानंतर स्थानिक नागरिकही विरोधासाठी समोर आले. नासुप्रच्या माध्यमातून दीड कोटी खर्चून हे खेळाचे मैदान अलिकडेच विकसित करण्यात आले आहे. वॉलीबॉल, बॅडमिंटन, सायकल पोलो, क्रिकेट आदी खेळ खेळले जातात. यानिमित्ताने मोठ्या संख्येने खेळाडू येथे येतात. या राजकीय सभेमुळे मैदानाचा सत्यानाश होईल, असा भाजप नेत्यांचा आरोप असून, मैदानाची दुर्दशा टाळण्यासाठी अन्य ठिकाणी सभा घेण्याची त्यांची मागणी होत आहे. खोपडेंसह, स्थानिक माजी नगरसेवकांनीही सभेला विरोध दर्शविला आहे. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष प्रविण दटके यांनी सभेला आमचा विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आम्ही अटी शर्तींचे पालन करू : सुनील केदार

एकंदर या सभेच्या ठिकाणाला विरोध सुरू असतानाच, काँग्रेस व महाविकास आघाडीने जोरात तयारी सुरू केली आहे. आमच्या सभेला स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याचे सांगितले जात असले, तरी आम्हाला कुठेही विरोध दिसत नाही. काही अटी शर्तींसह आम्हाला नागपूर सुधार प्रन्यासने मैदानावर राजकीय सभेची परवानगी दिली आहे. आम्ही त्या अटी शर्तींचे पालन करू. व्यासपीठ उभारण्यासाठी सुद्धा मैदानावर खड्डे खोदले जाणार नाहीत. मैदानावरील क्रीडा सुविधा खराब होणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ, असे महाविकास आघाडीचे नेते सुनील केदार यांनी सांगितले आहे.

दरम्यान,क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून ज्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे त्यावर काँग्रेसने प्रश्ननचिन्ह उभे केले आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात या महाराष्ट्राला २५ वर्ष मागे ढकलण्याचे काम झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्याला लुटण्याचे काम केले असून, एक ही प्रोजेक्ट किंवा  काम मविआच्या माध्यमातून राज्यात ना  नागपुरात झालेले नाही. हे सर्व नेते खोटे बोलून रेटून बोलणारे लबाडाचे निमंत्रण असल्याचा आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे. सद्भभावना नगर दर्शन कॉलनीचे मैदान सोडून सभा घ्यावी, मविआचे तीन पक्ष असताना इतक्या छोट्या मैदानात नव्हे तर, १ लाख क्षमता असलेल्या कस्तुरचंद पार्कवर सभा घ्यावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

हेही वाचा :

Back to top button