चंद्रपूर: बापाच्या दारूची नशा चिमुकल्याच्या जीवावर बेतली | पुढारी

चंद्रपूर: बापाच्या दारूची नशा चिमुकल्याच्या जीवावर बेतली

चंद्रपूर: पुढारी वृत्तसेवा : दारूच्या नशेत पती पत्नीचे भांडण झाले. पत्नी माहेरी निघून गेली. त्यानंतर चिमुकल्याला घेऊन मुलासोबत घरी एकटाच आणि दारुच्या नशेत तर्र असलेल्या एका निर्दयी बापाने 3 वर्षाच्या चिमुकल्याचा गळा आवळून खून केला. ही खळबळजनक घटना आज ( दि. ९) मूल तालुक्यातील राजोली गावात उघडकीस आली. प्रियांशु गणेश चौधरी (वय 3) असे मृत मुलाचे नाव आहे. तर गणेश विठ्ठल चौधरी (वय 33) असे निर्दयी वडिलाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मूल तालुक्यातील राजोली येथील रहिवासी गणेश विठ्ठल चौधरी हा पत्नी काजल आणि 3 वर्षाच्या मुलगा प्रियांशुसह राहत होता. हनुमान जयंतीच्या दिवशी पतीने दारू पिऊन पत्नीसोबत भांडण केले. भांडण टोकाला गेल्याने पत्नीला मारहाण केली. रागाच्या भरात पत्नी माहेरी निघून गेली. त्यामुळे गणेश मुलगा प्रियांशुसोबत एकटाच होता. गणेश दारूच्या नशेत तर्र असताना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांने प्रियांशुचा गळा आवळून खून केला.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रियांशुच्या मृतदेहाचा पंचनामा केला. तर जखमी अवस्थेत असलेल्या गणेशला मूल उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

हेही वाचा 

Back to top button