पुणे तापलं ! चंद्रपूर नंतर सर्वाधिक तापमान शिरूरमध्ये, पारा 40 अंशांवर | पुढारी

पुणे तापलं ! चंद्रपूर नंतर सर्वाधिक तापमान शिरूरमध्ये, पारा 40 अंशांवर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : फेब्रुवारीनंतर प्रथमच पुणे जिल्ह्याचा पारा एप्रिलमध्ये चाळिशीच्या पार गेला. चंद्रपूर (40.4) नंतर सर्वाधिक तापमान शिरूरमध्ये (40.2) नोंदविले गेले. बुधवारी संपूर्ण जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान 37 ते 40 अंशांवर होते. दरम्यान, आगामी दोन दिवस संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यंदा संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात पुणे जिल्हा राज्यात बहुतांश वेळा तापमानात आघाडीवर होता. कोरेगाव पार्कपासून राज्य तापण्यास सुरुवात झाली होती.

त्यापाठोपाठ शिरूर, सोलापूर, दौंड या भागांचा पाराही चाळिशीच्या पार गेला होता. मात्र, मार्च महिन्यात जिल्ह्याचे सरासरी तापमान 35 ते 36 अंशांवर स्थिर होते. कारण, या काळात जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने पारा खाली आला होता. बुधवारी 5 एप्रिल रोजी पुन्हा पारा वर चढला आहे. बुधवारचे जिल्ह्याचे कमाल तापमान… (अंश सेल्सिअसमध्ये) शिरूर 40.2, कोरेगाव पार्क 39.5, लवळे 39, वडगाव शेरी 39, चिंचवड 38, मगरपट्टा 37.9, खेड 37.7, इंदापूर 37.3, दौंड 37.2, बालेवाडी 37, शिवाजीनगर 36.8, तळेगाव 36.7.

आजपासून चार दिवस वादळी वार्‍यासह पावसाचे
आगामी चार दिवस राज्यात वादळी वार्‍यासह पावसाचे आहेत, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कमाल तापमानातही वाढ झाल्यामुळे दिवसभर उकाडा, तर दुपारनंतर पाऊस असे वातावरण 6 ते 9 एप्रिलदरम्यान राहील. हिमालयात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला आहे तसेच आसाम व ओडीशा राज्यांत चक्रीवादळ सदृश्यस्थिती निर्माण झाल्याने या दोन्ही वार्‍यांची टक्कर महाराष्ट्रावर होत आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात आगामी तीन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे.राज्यातील बहुतांश भागांत वादळी वार्‍यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Back to top button