नागपूर: ‘मविआ’च्या सभेकडे पाठ: नाना पटोले, यशोमती ठाकूर गुजरातमध्ये

file photo
file photo

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर आदी विदर्भातील अनेक नेते गुजरातमध्ये सुरतला पोहोचले आहेत. मात्र, रविवारी (दि.२) महाविकास आघाडीच्या जाहीर सभेला संभाजीनगरला न गेलेल्या पटोले यांनी आज सुरत गाठल्याने उलट-सुलट सवाल उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे आज नागपुरात केडीके महाविद्यालयात सायंकाळी बैठक होत आहे. १६ एप्रिलरोजी नागपुरात मविआच्या नेत्यांची जाहीर सभा होणार आहे. या बैठकीत पटोले गैरहजर राहणार का ? हा प्रश्न आहे.

दरम्यान, काँग्रेसने आज गुजरातमध्ये शक्तिप्रदर्शन केले. यासंदर्भात बोलताना माजी मंत्री यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या. आमदार आणि नेत्यांची गाड्या अडवून चौकशी होत आहे. राज्यातील शिंदे गटाचे आमदार सुरतला रवाना झाले होते. त्यावेळी अशीच चौकशी केली होती का ? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी गुजरात पोलिसांना केला. हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. सुरतला रवाना होत असताना आमदार यशोमती ठाकूर यांची गाडी गुजरात पोलिसांनी अडवली. त्यावेळी पोलिसांनी लाइव्ह स्ट्रीमींग कॅमेराधारक दोन कर्मचारी यशोमती ठाकूर यांच्यासमोर उभे केले आणि याचे थेट लाइव्ह गांधीनगरमध्ये होत आहे, असे सांगितले.

यावर आमचा नेता गुजरातला आहे, त्यांच्या समर्थनासाठी आम्ही जाऊ शकत नाही का? काय करायचं ते करा, आम्ही घाबरत नाही, असं म्हणत ॲड. यशोमती ठाकूर यांनी पोलिसांना विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी यशोमती ठाकूर यांच्या गाडीस जाऊ दिले. भारतासारख्या देशात जर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ देण्यासाठी अशा पद्धतीची अरेरावी होत असेल. तर ही बाब गंभीर आहे. राज्यातील सत्तांतरासाठी गुजरातने बंडखोर आमदारांना रेड कार्पेट टाकून सुरक्षा दिली. आणि आज काँग्रेसच्या आमदारांना प्रतिबंध का केला जात आहे, याचा निषेध यशोमती ठाकूर यांनी केला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news