संजय राऊत यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल करावा; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी | पुढारी

संजय राऊत यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल करावा; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याने जर पुन्हा दंगली झाल्या तर राऊत यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. खैरे-राऊत यांच्यामुळे शहरातील वातावरण बिघडू शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

चंद्रशेखर बावनकुळे नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. खा. राऊत चिथावणीखोर विधाने करत आहेत. यापूर्वी देखील राज्यात दंगली घडल्या. मात्र, आम्ही विरोधी पक्षात असूनही अशी वक्तव्ये केली नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या शांतता आहे. मात्र सकाळी वाजत असलेला संजय राऊत नावाचा भोंगा बंद केला पाहिजे. अन्यथा जनताच तो भोंगा बंद करेल. यापुढे छत्रपती संभाजीनगरात जर पुन्हा दंगली घडल्या तर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना गुन्हेगार करावे.

दरम्यान, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद असून अशीच भूमिका इतरही विरोधी पक्षाचे नेते घेतील अशी अपेक्षा आहे. महाविकास आघाडीने त्यांची सभा घ्यावी, आम्ही देखील वीर सावरकर गौरव यात्रा काढणार आहोत. मात्र, संजय राऊत यांनी जर भडकाऊ भाषण केले तर महाविकास आघाडीची सभा कशी होईल मला माहिती नाही, असा इशारा त्यांनी दिला.

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजी नगर येथील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून लवकरच या घटनेतील सूत्राधर समोर येतील असेही बावनकुळे म्हणाले. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने उमेदवार द्यावा किंवा न द्यावा हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही आमचा उमेदवार देऊन निवडणुकीला सामोरे जाऊ, असे बावनकुळे म्हणाले.

अधिक वाचा :

Back to top button