

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या खामलास्थित कार्यालयात पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देणारे फोन आल्याने नागपुरात खळबळ माजली. दरम्यान, मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत आज (दि.२१) सी-20 परिषदेचा समारोप होणार असल्याने कार्यक्रमस्थळी सुरक्षा कडक करण्यात आली आहे. गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात मंगळवारी सकाळी धमक्या देणारे तीनदा फोन आल्यामुळे खळबळ माजली आहे.
पोलिसांनी धमक्या देणाऱ्या फोन कॉल्सचा शोध सुरु केला आहे. सकाळी पहिला फोन सुरक्षा रक्षकांनी घेतला. धमकी देणाऱ्याने आपले नाव जयेश पुजारी असे सांगितले. आणि 10 कोटींची मागणी केली. गडकरी यांच्या कार्यालयातील लँडलाईन क्रमांकावर हे धमकीचे कॉल आले. या कॉलप्रकरणी कार्यालयाने नागपूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेत वाढ केली. तसेही देशविदेशातून पाहुणे सध्या नागपुरात असल्याने गडकरी निवासस्थानी आणि रॅडीसन हॉटेलचा परिसर कडक सुरक्षा व्यवस्थेत आहे. गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे कॉल आले. धक्कादायक म्हणजे पुन्हा एकदा जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याच्या नावाने धमकीचे कॉल आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका मुलीच्या फोनवरून हे कॉल झाले आहेत. मात्र, तिला याविषयी माहिती नाही. तिच्या फोन क्रमांकाचा गैरवापर झाला असावा, असे पोलिसांना वाटते. यापूर्वी 100 कोटींची खंडणी मागण्यासाठी कुख्यात दाऊदच्या नावाने गडकरींना कार्यालय उडविण्याच्या धमकीचे फोन आले होते. याविषयीचा मागोवा घेण्यासाठी नागपूर पोलिसांचे पथक बेळगावला जाऊन आले. अनेक नावे, नंबर असलेली एक डायरी पोलिसांनी जप्त केली होती. आता दोन महिन्यात पुन्हा धमकीचे फोन आल्याने नागपूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
यापूर्वी जानेवारी महिन्यात गडकरी यांच्या कार्यालयात धमकी देणारे कॉल आले होते. ते कॉल कर्नाटकातील बेळगाव तुरुंगातून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. आज पुन्हा त्याच संशयिताच्या नावाने धमकीचे कॉल आल्याने पोलिस यंत्रणा देखील चक्रावून गेली आहे.
हेही वाचा