यवतमाळ : विद्युत तारेला स्पर्श झाल्याने १७ वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू | पुढारी

यवतमाळ : विद्युत तारेला स्पर्श झाल्याने १७ वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथील वार्ड क्रमांक चारमधील खडकपुरा परिसरात रविवारी रात्री ११ वाजता ही घटना घडली. सुमय्या युनूस पठाण असे मृत्यू झालेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. अभ्यास करत असताना आईला सांगून घराच्या बाहेर आली. चेहऱ्याला पाणी मारून ओल्या हाताने ती तारेवर टॉवेल टाकायला गेली असता तार वीज प्रवाहित असल्याने त्या तारेचा तिला जबर धक्का लागला.

धक्का लागताच सुमय्या जोराने ओरडली. त्यामुळे तिची आई बाहेर आली असता, सुमय्या तारेला पकडून पडून होती. तिला स्पर्श केला असता आईलासुद्धा शॉक लागला. नंतर तिच्या वडिलांनी मेन स्वीच बंद करून मुलीला तारेच्या दूर केले. आवाजाने शेजारचे लोक धावून आले. तिला स्थानिक खासगी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, उपचार मिळाले नाही. अखेर शासकीय रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तिला रेफर करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला आदिलाबाद येथे हलविले. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. आज सोमवारी सकाळी १० वाजता आदिलाबाद पोलिसांनी पंचनामा केला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.

हेही वाचलंत का?

Back to top button