नागपूर: 'आरटीई' ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ | पुढारी

नागपूर: 'आरटीई' ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यासह राज्यभरात शिक्षण हक्क कायदा आरटीईअंतर्गतच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला पालकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता आता २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात आजवर आरटीईच्या ६५३ शाळांसाठी सुमारे ३३ हजारांहून अधिक अर्ज सादर झाले आहे. गतवर्षी ही अर्जसंख्या ३१ हजार इतकी होती.

आरटीईअंतर्गत आर्थिक व दुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिल्या जातो. शैक्षणिक सत्र २०२३-२४ साठीची यंदाची आरटीईची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १ मार्चपासून सुरू करण्यात आली. अर्ज करण्यासाठी १७ मार्चला मुदत संपली. नागपूर जिल्ह्यात निर्धारित ६५३ शाळांमध्ये ६५७७ जागा आरटीईअंतर्गत राखीव असून त्यासाठी यंदा ३३,२३७ अर्ज प्राप्त झाले आहेत. गतवर्षी ३१,४११ अर्ज प्राप्त झाले होते. त्या तुलनेत यंदा अर्ज वाढले आहेत. गतवर्षी जिल्ह्यात ६६३ शाळांची नोंदणी झाली होती. तेव्हा जिल्ह्याकरिता ६१८६ जागा राखीव होत्या. गतवर्षी लॉटरी पद्धतीने ५ हजार ४३१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. व ७५५ जागांवर प्रवेश झाले नव्हते. यंदा जिल्ह्याकरिता ६ हजार ५७७ जागांचा कोटा निश्चित झाला आहे. यंदा शाळा घटल्या, पण राखीव जागा वाढल्या आहेत. आतापर्यंत ३२,२९० अर्ज प्राप्त झाले आहेत.

राज्यात १ लाख जागा, ३.१५ लाख अर्ज

राज्यभरात आरटीईअंतर्गत ८, ८२८ शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव आहेत. राज्यात १,०१,९६९ जागांचा कोटा असून त्यासाठी आतापर्यंत ३,१५,५६१ वर अर्ज प्राप्त झाले आहेत. पुण्यात सर्वाधिक ९३६ शाळांमध्ये १५, ६५५ जागा राखीव असून त्यासाठी ६८,३४५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या खालोखाल ठाण्यामध्ये ६२९ शाळांमध्ये १२, २७८ जागा असून २७, ७४० आणि नागपूरमध्ये ६५३ शाळांतील ६,५७७ जागांसाठी ३३,२३७ अर्ज प्राप्त झाले आहेत.

हेही वाचा 

Back to top button