नागपूर: संपकरी शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा खंडित करण्याची नोटीस | पुढारी

नागपूर: संपकरी शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा खंडित करण्याची नोटीस

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : राज्य कर्मचारी संघटना व इतर कर्मचारी संघटनांनी जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांसाठी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. शुक्रवारीसुद्धा संविधान चौकात कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा कायम होता. जिल्हा परिषदेच्या काही कर्मचाऱ्यांना गुरुवारी मेस्मा अंतर्गत सेवा खंडित का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे. आज आणखी काही कर्मचाऱ्यांना सेवा खंडित करण्याची बीडीओंनी नोटीस बजाविली. त्यानंतर संपकरी कर्मचाऱ्यांनी नोटीस बजाविणाऱ्या बीडीओंचा निषेध नोंदविला. ज्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली त्यांनी उत्तरे देऊ नयेत, असे एकमताने ठरविण्यात आले. आज अनेक अंध व दिव्यांग बांधवांनी आंदोलनात सहभागी होत शासनविरोधात घोषणा दिल्या.

शनिवारी १८ मार्चला यशवंत स्टेडियम ते संविधान चौक दरम्यान सकाळी ११ वाजता नागपूर शहर व जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सर्वजण पांढरे वस्त्र परिधान करून सहभागी होणार आहेत. या मोर्चात किमान ५० हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याचा दावा कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी केला आहे. तर मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

आजच्या आंदोलनात संजय सिंग, डॉ. सोहन चवरे, अरविंद अंतूरकर, सुदाम पांगुळ, विजय बुरेवार, गोपीचंद कातुरे, अरविंद मदने, संजय तांबडे, सुजित अढाऊ, संतोष जगताप, भास्कर झोडे, किशोर भिवगडे, अक्षय मंगरुळकर, सुभाष पडोळे, जयंत दंढारे, योगेश राठोड, निरंजन पाटील, उमेश जायेभाये, योगेश हरडे, संगीता चंद्रिकापुरे, रंजना कांबळे, अलका खंते, हेमा सुरजुसे आदी कर्मचारी नेत्यांचा सहभाग होता.

हेही वाचा 

Back to top button