चंद्रपूर: गुरू-शुक्र ग्रहांची बुधवारी विलोभनीय युती; १५ वर्षानंतर पाहण्याची संधी
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : पश्चिम आकाशात अतिशय विलोभनीय आणि दुर्मिळ अशी गुरू आणि शुक्र ग्रहांची युती बुधवारी (दि.१) सुर्यास्तानंतर पाहावयास मिळणार आहे. ही अशी युती १५ वर्षानंतर दिसत असून पुन्हा पाहण्यासाठी १५ वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
सद्या गुरू आणि शुक्र हे मीन राशीत असून ते गेल्या आठवड्यापासून जवळ येत होते. १ ते ५ मार्चपर्यंत ही युती जवळ राहणार असली तरी सर्वाधिक जवळ बुधवारी येणार आहे. आकाशात सर्वाधिक तेजस्वी असे दोन ग्रह एक डिग्रीपेक्षा कमी अंतरावर येण्याची आणि पाहण्यासाठी ही दुर्मिळ संधी असेल. ही युती भासमान युती आहे, जरी हे दोन ग्रहजवळ दिसत असले, तरी पृथ्वीपासून त्यांचे अंतर खूप जास्त आहे. बुधवारी शुक्र पृथ्वीपासून २०, ५६, ३१, १४१ कोटी किमी, तर गुरू ८६,१८,४३,१९२ कोटी किमी अंतरावर असतील. १ मार्चला दोघांतील अंतर एक डिग्रीच्या कमी म्हणजे ३९ आर्कमीटर अंतरावर असेल. तर २ मार्चला ४५ आर्कमीटर अंतरावर असेल. या दरम्यान शुक्राची तेजस्विता – ४.२ तर गुरुची तेजस्विता – २ ० असेल. ३, ४, ५ मार्च पर्यंतसुद्धा ते १ ते २ डिग्री इतक्या कमी अंतरावर असतील. पुढे गुरू ग्रह सूर्याकडे गेलेला दिसेल. तर शुक्र आकाशात वर येताना दिसेल.
चंद्रपुरात युती निरीक्षण शिबिराचे आयोजन
महाराष्ट्रातील सर्व खगोलप्रेमी विद्यार्थी आणि नागरिकांनी ही दुर्मिळ युती पाहण्याची संधी सोडू नये, असे आवाहन प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे. चंद्रपूर येथे १ मार्चरोजी डॉ. पंजाबराव देशमुख शाळा, वडगाव, आंबेडकर सभागृहाजवळ, चंद्रपूर येथे संध्याकाळी ६.०० ते ८.०० च्या दरम्यान गुरू, शुक्र युती अवकाश निरीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी खगोल प्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्काय वॉच ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा